breaking-newsपुणे

राज्यात दूध “ओवरफ्लो’!

परराज्यांतील दूध डोकेदुखी : 30 लाख लिटर दूध अतिरिक्त
– राज्यशासनाने वेळीच निर्णय घेणे आवश्‍यक

पुणे – राज्यात दररोज 2 कोटी 20 लाख लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. याशिवाय परराज्यांतून म्हणजे गुजरात, मध्यप्रदेश व कर्नाटक येथून दररोज 28 लाखांहून अधिक लिटर दूध महाराष्ट्रात येत आहे. त्यामुळे राज्यात मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याचे चित्र आहे. या अतिरिक्त दुधाबाबत राज्यशासनाने काही तरी निर्णय घेणे आवश्‍यक असल्याचे मत दुग्ध व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
राज्यातील दुधासंदर्भात घेतलेल्या माहितीनुसार, अमूल डेअरीची राज्यात 24 लाख लिटरची विक्री आहे. तर या तुलनेत 7 ते 8 लाख लिटर दुधाची खरेदी केली जाते. मदर डेअरी नवी दिल्लीला दररोज 10 लाख लिटर दूध राज्यातून जात होते. त्यांनी मागणी कमी केल्यामुळे सध्या 1 लाख 30 हजार लिटर दूध जाते. परदेशात भुकटी निर्यात केली जात होती. त्यामुळे दररोज भुकटीसाठी 9 ते 10 लाख लिटर दूध वापरले जात होते. सध्या ही भुकटी निर्यात बंद आहे. त्यामुळे एकत्रित झालेला परिणाम लक्षात घेता जवळपास 30 लाख लिटर दूध अतिरिक्त आहे. हे अतिरिक्त दुधाचे वितरण कशाप्रकारे करायचा, असाच मोठा प्रश्‍न सध्या दूध उत्पादकांना पडला आहे. त्यासाठीच शासनाने हे अतिरिक्त दूध खरेदी करावे, असा प्रस्ताव समोर येत आहे. अथवा दूध भुकटी निर्यातीसाठी राज्य व केंद्र सरकारने 8 ते 10 टक्‍के अनुदान द्यावे. यापूर्वी केंद्र सरकारने वेळोवेळी 7 ते 8 टक्के अनुदान दिले आहे. त्याचा चांगला परिणाम झाला होता. कर्नाटक राज्याने थेट दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान दिले आहे. त्यानुसार राज्य शासनाने वाजवी अनुदान देण्याची कार्यवाही करावी, अशी अपेक्षा दूध व्यावसायिक संघांने व्यक्त केली आहे.

असे आहेत विविध प्रकल्पांचे दूध खरेदी दर
वारणा, कात्रज, गोकुळ, राजहंस आदी सहकारी दूध संघांची विक्री व्यवस्था सक्षम आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांना 21 ते 25 रुपये प्रतिलिटर बाजारभाव देतात. पराग, डायनामिक, प्रभात, गोकुळ, सारथी, सहारा, आकाश, स्वराज, गोविंद आदी खासगी दूध प्रकल्पामार्फत दुग्धजन्य पदार्थाची विक्री केली जाते. त्यामुळे हे खासगी प्रकल्प 21 ते 22 रुपये प्रतिलिटरला बाजारभाव देतात. भुकटीचे विक्रीचे दर 130 ते 135 रुपये किलो आहेत. जे प्रकल्प फक्त भुकटी तयार करतात, ते 18 ते 19 रुपये प्रतिलिटरपेक्षा अधिक बाजारभाव देऊ शकत नाही, अशी माहिती समोर आली आहे.

24 लाख लिटर
अमूल डेअरीची दूध विक्री

———–

8 ते 10 टक्‍के
भुकटीसाठी अनुदानाची मागणी
————-

8 लाख 70 हजार लिटर
दुधाची मागणी मदर डेअरीकडून कमी
—————

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button