राज्यात गोदामांचे ग्रीड निर्माण करणार – सुभाष देशमुख

मुंबई : राज्यात हमी भावाने कापूस, तूर, हरभरा व इतर कडधान्ये तसेच तृणधान्ये खरेदीसाठी गोदामांची जिल्हानिहाय उपब्धता, साठवण क्षमता आदी तपशील जमा करुन राज्यातील विविध विभागाच्या गोदामांचे जाळे (ग्रीड) निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
राज्यातील सहकारी पणन व्यवस्था बळकट करण्यासाठी ‘अटल महापणन विकास अभियान’ राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध उपक्रमांबरोबरच धान्य साठवण गोदामांचा व्यावसायिक व पूर्ण क्षमतेने वापर अपेक्षित आहे. यासाठी कार्पोरेट क्षेत्रासह समाजाच्या विविध घटकांचा सहभाग घेण्यात येत आहे. राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गहू व इतर तृणधान्य, तूर, हरभरा आदी कडधान्ये, कापूस खरेदी होत असते. काही वेळा उत्पादन खूप वाढल्यामुळे गोदामांच्या उपलब्धतेत अडचणी निर्माण होतात. ही बाब टाळण्यासाठी राज्यातील विविध विभागांच्या गोदामांचे जाळे निर्माण केल्यास जिल्हानिहाय उपलब्ध गोदामे व त्यातील एकूण साठवण क्षमता, उपलब्ध क्षमता याची माहिती तात्काळ मिळेल.