राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी उद्योगधंदे समन्वय अभियान

पुणे – राज्यातील बहुतांशी अभियांत्रिकी महाविद्यालये सध्या आर्थिक संकटातून जात असल्याने राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने या महाविद्यालयांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी व नवी दिशा देण्याच्या हेतूने उद्योगधंदे समन्वय अभियान राबविण्यात येणार आहे.
याबाबत पुणे विभागीय तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सर्व संलग्न महाविद्यालयांना पत्र लिहून याबाबत कळविण्यात आले आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, सद्यस्थितीत जागतिक मंदीच्या अनुषंगाने सर्व पदवी व पदविका अभियांत्रिकी महाविद्यलायांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट अवस्थेकडे जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.अभय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात एक अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची मध्यवर्ती संकल्पना सर्व अभियांत्रिकी संस्थांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणारी असून त्या अनुषंगाने इम्पोर्ट सब्टीट्यूट या विषयावर विशेष भर देण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक अभियंत्यांची उद्योगप्रियता व उद्योगशिलता विकसित करुन संपूर्ण संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष देणे गरजेचे असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक महाविद्यालयालच्या अध्यक्ष सचिवांना याबाबतचे आवाहन करण्यात आले असून यामध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान हे अभियान कधी, कुठे व कसे राबविण्यात येणार आहे याची माहिती संचालनालयाकडून अद्याप जाहीर केलेली नाही.