राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर (वय 67) यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदय विकाराने तीव्र झटक्याने निधन झाले. फुंडकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन तपासणी केली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे चारच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात नेण्यास सांगितले. पण, सोमय्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालविली होती. बुलडाणा, खामगाव परिसरात भाजपला वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. शेतकऱ्यांशी भाजपला जोडण्याचे काम फुंडकर करत होते. राज्यात शेतकऱ्यांची आंदोलने होत असताना फुंडकर यांनी योग्य पद्धतीने ती हाताळली. सामान्या नागरिकांशी नाळ जोडलेला नेता अशी त्यांची ओळख होती.