‘राजीव गांधी हे मॉब लिंचिंगचे जनक’, भाजपाच्या प्रवक्त्याचे वादग्रस्त ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (४ मे रोजी) उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना ‘भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला’, असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरुन आता विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. मोदींच्या या वक्तव्यावरुन वाद सुरु असतानाच भाजपाचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन राजीव गांधीबद्दल एक वादग्रस्त ट्विट केले आहे. बग्गा यांनी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिंचिंग’ (राजीव गांधी हे मॉब लिंचिंगचे जनक आहेत) असा आशय असलेल्या होर्डिंग्जचा फोटो ट्विट केला आहे.
मागील वर्षी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी १९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्ष सहभागी नव्हता असा दावा केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच ऑगस्ट महिन्यामध्ये बग्गा यांनी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिंचिंग’ अशी होर्डिंग दिल्लीमध्ये लावली होती. त्याच होर्डिंगचा फोटो त्यांनी आता पुन्हा पंतप्रधानांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर ट्विट केला आहे. ‘राजीव गांधी हे तुमच्यासाठी…’ असं त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
राजीव गांधी ‘भारताचे सर्वात मोठे मॉब लिचर’
पंजाबमधील अकाली दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते मंजिंदर सिंग सिरसा यांनाही राजीव गांधी यांना ‘भारताचे सर्वात मोठे मॉब लिचर’ म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींवर केलेली ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ ही टिका योग्य असल्याचे समर्थन करताना सिरसा यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘पंतप्रधानांनी राजीव गांधींना नंबर एकचे भ्रष्टाचारी म्हटले आहे ते खरेच आहे. भ्रष्ट असण्याबरोबरच राजीव गांधी भारतातले नंबर एकचे मॉब लिचर होते,’ अशी टिका सिरसा यांनी केली आहे.
काय आहे या होर्डिंग्जची पार्श्वभूमी
दिल्लीत १९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्ष सहभागी नव्हता असा दावा काँग्रेस राहुल गांधी २०१८ साली इंग्लंडमध्ये केला होता. त्यानंतर भाजपा आणि पंजाबमधील अकाली दलाने या मुद्यावरून काँग्रेसला घेरले. त्यावेळी दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिंचिंग’ असा आशय असलेले होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. भाजपाचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी हे होर्डिंग्ज लावले आहेत.
२८ ऑगस्ट २०१८ रोजी तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली होती. या सर्व फलकांवर प्रकाशक तेजिंदरपालसिंग बग्गा असे नाव आहे. त्याआधी राजीव गांधी यांच्या जयंतीदिवशीही बग्गा यांनी राजीव गांधी हे मॉब लिंचिंगचे (जमावाकडून होणारी हत्या) जनक असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी यावरून मोठा वाद झाला होता. माजी पंतप्रधानांचा अवमान केल्याप्रकरणी बग्गा यांच्याविरोधात काँग्रेसने दिल्ली पोलिसांत तक्रारही केली होती. १९८४ मध्ये राजीव गांधी यांच्या भूमिकेमुळे झालेल्या दंगलीतून शीख समाज आज ही सावरला नसल्याचे बग्गा यांनी म्हटले होते. शीख दंगलीप्रकरणी काँग्रेसला कधीच माफ केले जाणार नाही, असे ते म्हणाले होते.
२०१८ साली लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना १९८४ सालच्या शीख विरोधी दंगल आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राहुल यांनी उत्तर देताना, ‘मनमोहन सिंग आमच्या सर्वांच्या वतीने बोलले. मी स्वत: हिंसाचाराने पीडित आहे. त्यामुळे त्या वेदना काय असतात हे मला चांगले ठाऊक आहे. पृथ्वीवर कोणाच्याही विरोधात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार करण्याला माझा विरोध आहे. जेव्हा कोणाला वेदना होतात तेव्हा ते पाहून मला दु:ख होते. त्यामुळे मी शीख विरोधी दंगलीचा निषेध करतो. जे कोणी अशा प्रकारच्या हिंसाचारात सहभागी आहेत त्यांना शासन झालेच पाहिजे,’ असे मत व्यक्त केले होते.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजधानी दिल्लीत उसळलेल्या त्या दंगलीत तीन हजार शिखांची हत्या करण्यात आली होती.