राजा परांजपेच्या नावाने मराठी चित्रपटसृष्टीची ओळख :मोहन आगाशे

राजा परांजपे महोत्सवाचे उद्घाटन
पुणे – राजा परांजपेंच्या चित्रपटांचे आपण लहानपणापासूनचे चाहते असून राजाभाऊंच्या नावानेच मराठी चित्रपटसृष्टीची ओळख होती आणि ती आजही कायम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी केले.
आठव्या राजा परांजपे महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आगाशे बोलत होते. यावेळी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता जितेंद्र जोशी, मेधा मांजरेकर, शास्त्रीय गायक महेश काळे यांचा सन्मान आगाशे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर सुधीर गाडगीळ यांनी पुरस्कार्थींशी संवाद साधला. राजा परांजपे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे व विश्वस्त अजय राणे यावेळी उपस्थित होते.
गोवारीकर म्हणाले, सिनेमाचे जग खूप व्यापक आहे. मात्र, चित्रपटरुपी कलाकृती कशी असावी, हे राजाभाऊंचे चित्रपट पाहून कळते. स्वातंत्र्योत्तर काळातील दमदार दिग्दर्शक, अभिनेता म्हणून त्यांची ओळख कायम आहे. चित्रपटांची लांबी विषय आणि आशयावर अवलंबून असते. चित्रपट तयार होत नाही, तर तो घडतो. प्रत्येक चित्रपटाची घडण्याची प्रक्रिया वेगवेगळी असल्याने त्याच्या यशाची गणितेही वेगळी असतात.
जितेंद्र जोशी म्हणाले, तुकाराम हे महाराष्ट्रातील एकमेवाद्वितीय कवी आहेत. मला लहानपणापासून अध्यात्माचे वेड होते. बेदारकपणा ते सजगपणा त्या चित्रपटामुळे मला मिळाला. प्रत्येकाची जडणघडण वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल मूळ स्वत्व कायम राखले पाहिजे. विरक्ती हेच अंतिम सत्य आहे.
महेश काळे म्हणाले, करिअर कशात करायचे हे कळण्याच्या आधीपासूनच मी गाण्यात रमायला लागलो होतो. दोन पदवी प्राप्त करुनही गाणे कधीच बंद केले नाही. माझे आयुष्य गाण्यासाठी समर्पित केले तरच अभिषेकीबुवांच्या शिकवणीला न्याय दिल्यासारखे होईल, असे वाटले. शास्त्रीय संगीतातील राग, लय शिकवता येते. मात्र, उपज अंगाने मुक्त विहार कसा करायचा, हे शिकवता येत नाही. संगीताचा गाभा फुलवण्यासाठी तो आयुष्याचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. मांजरेकर म्हणाल्या, आजवर अनेक नामांकने मिळाली. मात्र, आयुष्यातील पहिला पुरस्कार राजा परांजपे यांच्या नावाने मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. मी सिनेमात काम करेन, असे वाटले नव्हते. मात्र, महेशने मला संधी दिली.