breaking-newsराष्ट्रिय

राजधानीत दोन दिवसीय “महाराष्ट्र महोत्सव’

नवी दिल्ली – महाराष्ट्र दिनानिमित्त “पुढचे पाऊल’ आणि “महाराष्ट्र शासन’ यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र महोत्सवा’चे आयोजन दि. 5 व 6 मे 2018 रोजी कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात होणार आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव तथा “पुढचे पाऊल’ संस्थेचे संस्थापक व निमंत्रक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली.

दोन दिवसीय आयोजनामध्ये 5 मे रोजी महाराष्ट्रातील उद्योजकता, उद्योगांसाठी विविध संधी, महिला उद्योजकांच्या यशोगाथा, या व अशा अनेक विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासह नाटक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी या दरम्यान असणार आहे. ज्येष्ठ लेखक वसंत लिमये यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यासह याच दिवशी मराठी नाटक “बाप व्हाया फेसबुक’ याचे सादरीकरणही आहे.
“महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्र’मधला संवाद दृढ व्हावा यावर 6 मे रोजी चर्चासत्र होणार आहे. यासह “आजची मराठी कविता- दशा आणि दिशा’ याविषयावरील परिसंवाद होणार आहे. महराष्ट्रातील क्‍लसटरचा विकास आणि राज्यातील क्रीडा क्षेत्र याविषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुळ मराठी भाषिक मात्र, महाराष्ट्राबाहेर राहुन विविध क्षेत्रात नावलौकीक करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार या महोत्सवादरम्यान करण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ मुर्तिकार पद्मभुषण पुरस्कार प्राप्त राम सुतार आणि ज्येष्ठ साहित्यिका पद्मश्री पुरस्कार प्राप्त मालती जोशी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
दोन दिवसीय महाराष्ट्र महोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही उपस्थिती असणार आहे. यासह विविध केंद्रीय मंत्री, विविध क्षेत्रातील दिग्गजांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग असणार आहे. या महोत्सवादरम्यान संस्थेच्या संकेतस्थळाचे व स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.
दिल्ली येथे विविध केंद्रीय मंत्रालये व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने “पुढचे पाऊल’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध विधायक उपक्रम राबविण्यात येतात. सदर संस्था प्रथमच महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करीत असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगीतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button