रद्द केलेल्या 500, 1000च्या नोटांची पाकिस्तानकडून खरेदी

नवी दिल्ली – नोटाबंदीनंतर रद्द करण्यात आलेल्या रु. 500 आणि रु. 1,000 च्या नोटा खरेदी करण्याचा पाकिस्तानने सपाटा लावला आहे. भारताने रद्द केलेल्या नोटा मोठ्या प्रमाणावर खरेदी करून पाकिस्तान त्या कराची आणि पेशावर येथील सिक्युरिटी प्रेसमध्ये पाठवत आहे. रद्द केलेल्या नोटांचा वापर करून बनावट नोटा बनवण्याची चाल पाकिस्तान खेळत आहे. जुन्या नोटांमधील सिक्युरिटी वायर काढून ती बनावट नोटांमध्ये वापरण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे. अशा प्रकारे जुन्या नोटांमधील सिक्युरिटी वायर वापरून तयार केलेल्या बनावट नोटा ओळखणे मोठे कठीण होऊन बसणार आहे. या गोष्टीची भारताने गंभीर दखल घेतली आहे.
रद्द केलेल्या भारतीय नोटा खरेदी करण्यासाठी पाकिस्तान नेपाळमधील आयएसआयच्या नेटवर्कचा वापर करून घेत आहे.
नोव्हेंबर 2016 मध्ये रु. 500 आणि रु. 1,000च्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते, की रु.500 आणि रु. 1,000च्या बनावट नोटांची निर्मिती करून पाकिस्तान दहशतवाद प्रायोजित करत आहे. आणि त्याला आळा घालण्यासाठी नोटाबंदी अत्यंत महत्त्वाची आहे. नोटाबंदीमुळे दक्षिण एशियातील दहशतवादाला लगाम बसणार आहे.