रजनीकांतचा ‘काला’ कर्नाटकात रिलीज होणार नाही

सुपरस्टार रजनीकांतचा ‘काला’ कर्नाटकात रिलीज होणार नाही. “कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स’ने “काला’ रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकाशी संबंधित कावेरी पाणी व्यवस्थापनाच्या मुद्दयावरून रजनीकांतच्या वक्तव्याचाच हा परिणाम आहे. कावेरी पाणी वाटपावर रजनीकांत यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि तामिळनाडूसाठी कर्नाटकने कावेरीचे पाणी सोडावे, अशी मागणीही केली होती. त्यानंतर लगेच कर्नाटकमध्ये रजनीकांत यांच्यावर टीकेचा भडिमार व्हायला लागला. “काला’मध्ये रजनीकांत करीकलन नावाच्या एका गॅंगस्टरच्या भूमिकेमध्ये आहेत. मुंबईत राहणाऱ्या तमिळी नागरिकांच्या प्रश्नांवर “काला’ची कथा केंद्रीत असणार आहे.
मुंबईच्या झोपडपट्टीतील दादापासून गॅंगस्टर झालेला रजनीकांत यामध्ये बघायला मिळणार आहे. त्यांच्या समवेत नाना पाटेकरही “काला’मध्ये दिसणार आहेत. नाना एका नेत्याच्या रोलमध्ये दिसणार आहेत. नाना आणि रजनीकांत प्रथमच एका सिनेमामध्ये एकत्र काम करत आहेत. या दोघांशिवाय हुमा कुरेशी, अंजली पाटील आणि संजय त्रिपाठी सारखे हिंदी कलाकारही “काला’मध्ये असणार आहेत. दक्षिण भारतीय स्टाईलमध्ये जरी बनला असला तरी “काला’ हिंदी प्रेक्षकांनाही खेचून घेईल, असा निर्मात्यांचा विश्वास आहे. त्यामुळे जरी कर्नाटकात “काला’ रिलीज झाला नाही, तरी रजनीच्या बहुभाषिकप्रेक्षकांना तो अन्य राज्यांमध्ये जाऊन बघता येईल.