येत्या दोन वर्षांत नवी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी

नवी दिल्ली- बेंगळुरूत येत्या दोन वर्षांत नव्या स्वरूपातील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी उभी राहील असा विश्वास भारतीय क्रिकेट बोर्डाचे हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी व्यक्त केला आहे. या सुविधेसाठी जागा मिळविण्यासंदर्भातील वाद मिटल्यामुळे आता या अकादमीचा मार्ग मोकळा झाला आहे.
खन्ना यांनी पत्रकाद्वारे याबद्दल माहिती दिली की, भारतीय क्रिकेट बोर्ड आणि कर्नाटक सरकार यांचे अभिनंदन. प्रदीर्घ काळ सुरू असलेला हा वाद मिटविल्याबद्दल अमिताभ चौधरी यांचे विशेष आभार. हा वाद संपुष्टात आल्यामुळे बीसीसीआयची स्वतःची अशी मालमत्ता प्रथमच झाली आहे. भविष्यात बीसीसीआयची आणखी मालमत्ता असावी असा प्रयत्न असेल. पुढील दोन वर्षांत बेंगळुरू येथील देवनहळ्ळीत नव्या रूपातील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी उभी राहील. बोर्डाला आणखी २५ एकर जमीन उपलब्ध झाली की, जागतिक दर्जाची अकादमी उभी राहण्यास मदत होईल.
कर्नाटक राज्य सरकारकडून मिळणाऱ्या या जमिनीच्या कागदपत्रांची पूर्तता झाली असून त्यावर बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी व कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय देसाई व महाव्यवस्थापक डॉ. एम. व्ही. श्रीधर यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.