येत्या दोन दिवसात मान्सून महाराष्ट्र गोव्यात दाखल होणार

नवी दिल्ली – मान्सून येत्या दोन दिवसात महाराष्ट्र आणि गोव्यात दाखल होणार आहे. भारतीय हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमी किनाऱ्यावर विशेषत: मुंबईत येत्या 8 आणि 10 जून दरम्यान मोठी वृष्टी होण्याची शक्यता आहे असे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने म्हटले आहे.
सरकारी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सुनची प्रगती दमदारपणे सुरू असून येत्या 7 जून पासून केरळ, तटवर्ती कर्नाटक, कोंकण आणि गोव्यात तो चांगल्या प्रमाणात बरसेल. 10 जून नंतर त्याची तीव्रता अधिक असेल. त्यामुळे या भागात पुरजन्य स्थिती निर्माण होण्याचा धोकाही या खात्याने वर्तवला आहे.
केरळात 29 मे रोजीच मान्सून दाखल झाला आहे. त्याचे हे आगमन यंदा तीन दिवस आधीच झाले आहे. बंगालचा उपसागर, आसाम, अरूणाचल प्रदेश आणि त्रिपुरा तसेच मेघालयाचा उर्वरीत भाग, पश्चिम बंगालचा सब-हिमालयन भाग इत्यादी भागात तो लवकरच पसरण्याची शक्यता आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मान्सुनच्या आगेकुचसाठी अधिक अनुकुल वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि गोव्यात 6 जून पासूनच मोठ्या प्रमाणात पावसाला सुरूवात होईल अशी अपेक्षा आहे. स्कायमेट या संस्थेने म्हटले आहे की मुंबईत मान्सुनचे आगमन अत्यंत मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्या काळात लोकांनी घरातच राहणे पसंत करावे. या संस्थेच्या अंदाजानुसार 8, 9, 10 जून हे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना आधीच सावध केले पाहिजे असे स्कायमेटचे सीईओ जतीन सिंग यांनी म्हटले आहे.