‘या’ कारणामुळे भारतातील ५० प्रसिद्ध हॉटेल्स झाली बंद

नवी दिल्ली : मागच्या १२ महिन्यांमध्ये देशभरातील प्रसिद्ध अशी जवळपास ५० हॉटेल्स बंद पडली आहेत. महागाई, लहान हॉटेलमध्ये स्वस्तात मिळणारे पदार्थ तसेच एकूणच वाढता खर्च या कारणांमुळे ही हॉटेल्स बंद पडली असल्याचे बोलले जात आहे.
मूळ अमेरिकेतील असलेले डॉमिनोज आणि डंकिन डोनटस यांची भारतातील जुबिलेंट फूडवर्क्स मागच्या वर्षभरात आपली २६ आऊटलेटस बंद केली आहेत. तर टीजीआय फ्रायडेजनी मागच्याच महिन्यात आपली तीन स्टोअर बंद केली आहेत. याबरोबरच वेंडीज आणि क्रीस्पी क्रीम यांनीही आपली स्टोअर्स बंद केली आहेत. जेएसएम हॉस्पिटॅलिटीच्या कॅलिफोर्नियातील पिझ्झा किचन आणि दिल्लीचा कॅफे आऊट ऑफ द बॉक्स यांनाही आपल्या काही स्टोअर्सला ताळे ठोकावे लागले आहे. वाढती महागाई, जीएसटी, वाढती स्पर्धा यामुळे हॉटेल व्यवसायासमोरील आव्हाने वाढत असल्याचे फूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध जसपाल सभ्रवाल यांनी सांगितले.
फूड इंडस्ट्रीतील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हल्दीरामसारख्या स्थानिक स्नॅक्स सेंटरमधील पदार्थांची विक्री मॅकडोनल्डपेक्षाही जास्त होते. त्यामुळे अशाठिकाणी बर्गरसारख्या फूड जॉईंटसमधील खप कमी होतो. भारतात मॅकडोनल्ड्स आणि केएफसी यांसारख्या कंपन्यानी आधीच आपली जागा तयार केलेली असल्याने इतर बर्गर कंपन्यांना आपले स्थान तयार करणे काही प्रमाणात कठिण आहे. मागच्या चार ते पाच वर्षात ज्या परदेशी फूड कंपन्या भारतात दाखल झाल्या त्यांना आता आपल्या मॉडेलमध्ये बदल करावा लागत आहे. त्यामुळे येत्या काळात परदेशी फूड चेनचे भवितव्य आणखी धोक्यात येणार का असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.