‘या’ आहेत देशातील पहिल्या महिला हमाल

जयपूर : जगात कोणतंही काम अवघड आणि अशक्य नसतं. मात्र ते पूर्ण करण्याची तुमची तयारी हवी. ‘ असं जयपूरमधल्या मंजू देवी मोठ्या अभिमानानं सांगतात. त्या देशातल्या पहिल्याच महिला हमाल आहेत. महिलांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे आहे, पण हमाल होणं, प्रवाशांचे अवजड सामान उचलणं हे काम मात्र महिला करू शकत नाही असं म्हणतात. मुळातच महिला नाजूक त्यांना काय ओझी उचलायला जमणार असं अनेक जण म्हणतात. पण लोकांचा हाच विचार खोटा ठरवत मंजू यांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली.
जयपूर रेल्वे स्थानकावर त्या काम करतात. मंजू देवी यांच्या पतीचं १० वर्षांपूर्वी निधन झालं. मंजूचे पती महादेवदेखील हमाली करायचे. पदरात तीन मुलं होती. घरातला कर्ता पुरुष गेल्यावर मात्र पोटापाण्याचा प्रश्न मंजू देवींसमोर उभा राहिला. त्यांनी पतीच्या लायसन्स नंबरवर हमाली करायचा निर्णय घेतला. ‘मला हिंदी, इंग्रजी येत नाही. बॅगेचं वजन अधिक असल्यानं सुरुवातीला मला त्या उचलणं जड जायचं. पण, आता याची सवय झालीय. स्टेशनवरच्या हमालांनी मला यासाठी खूपच मदत केली’ असंही त्या एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाल्या.