यावर्षी भारत-पाक सीमेवरील चकमकीत तब्बल तीनशे टक्के वाढ

- सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची मोठी जीवित हानी .
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जवानांमध्ये सीमेवर होणाऱ्या चकमकीत यंदाच्या वर्षात तब्बल 300 टक्के वाढ झाली आहे. यामुळे गेल्या काही वर्षात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली असून जखमी झालेल्या जवानांची संख्याही मोठी आहे.
या संबंधात अधिकृत सूत्रांकडून जो तपशील उपलब्ध झाला आहे त्यानुसार यंदा आत्तापर्यंतच्या सुमारे पाच महिन्यातच या चकमकींचे प्रमाण तब्बल तीनशे टक्क्यांनी वाढले आहे. या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात सीमा सुरक्षा दलाचे पाच जवान चकमकीत ठार झाले असून 34 जवान जखमी झाले आहेत. भारत पाकिस्तान सीमेवर सन 2014 मध्ये 127 वेळा, 2015 मध्ये 350 वेळा, 2016 मध्ये 204 वेळा आणि सन 2017 मध्ये 111 वेळा चकमकी झाल्या होत्या.
पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या आगळीकीला तोंड देण्यासाठी बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलाने 2016 साली ऑपरेशन रूस्तम, 2017 साली अर्जून आणि 2018 मध्ये ऑपरेशन भीम अशी तीन महत्वाची ऑपरेशन्स राबवली. त्यातून पाकिस्तानला जरब बसेल अशी अपेक्षा होती पण ती फोल ठरली असून त्यांचा सीमेवरील प्रक्षोभक गोळीबार सुरूच आहे. उद्या मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्ष पुर्ण होत आहेत.
आपले सरकार पाकिस्तानला जरब बसवेल आणि काश्मीरात दहशतवाद्यांचे आव्हान मोडीत काढून जम्मू काश्मीरात शांतता प्रस्थापित करेल अशी ग्वाही देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला या दोन्ही बाबतीत अपयश आल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.