breaking-newsपुणे

यंदा आर्थिक मंदीचीच दिवाळी!

  • कपडे, फर्निचर, सोने-चांदी आणि वाहन खरेदीत ग्राहकांचा निरुत्साह

पुणे – सणांचा राजा असलेल्या दिवाळीत बाजारपेठेला गती मिळण्याऐवजी यंदा चक्क आर्थिक मंदीचीच दिवाळी असल्याचे चित्र जाणवत आहे. तयार कपडे, साडय़ांचे व्यापारी यांना मंदीसदृश वातावरण जाणवत आहे. तर, फर्निचर, सोने-चांदी, वाहन खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना मंदीचा फटका बसला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीमध्ये  किमान दहा ते पंधरा टक्क्य़ांची घट झाली असल्याचा सूर विविध क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी आळविला आहे.

दोन वर्षांपूर्वी लागू झालेली नोटाबंदी आणि त्यानंतर वस्तू व सेवा कराची झालेली अंमलबजावणी या कारणांमुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे. त्या सगळ्या व्यथा विसरून यंदाची दिवाळी खरोखरीच दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी ठरेल, ही अपेक्षा होती. मात्र, त्यावरही ग्राहकांच्या अनुत्साहाचे विरजण पडले आहे. आता दिवाळीला जोडून आलेला शनिवार-रविवार हे चित्र पालटेल, अशी आशा व्यापाऱ्यांनी बोलून दाखविली. त्याला काही प्रमाणात यश आले तरी यंदाच्या दिवाळीमध्ये बाजारपेठेवर संक्रांत आली असल्याचे जाणवते हे वास्तव नाकारता येत नाही, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

कपडय़ाच्या विक्रीत घट

तयार कपडय़ांच्या बाजारपेठेमध्ये गेल्या वर्षी झालेल्या दिवाळीच्या तुलनेत यंदा किमान दहा ते बारा टक्क्य़ांची घट झाल्याची माहिती ‘कॉटन किंग’चे कौशिक मराठे यांनी दिली. शाळांच्या परीक्षा संपून शनिवारपासून (३ नोव्हेंबर) दिवाळीची सुटी सुरू झाल्यामुळे अनेकांना खरेदी करण्यासाठी सवड मिळालेली नाही. ‘टायझर’चे कुणाल मराठे म्हणाले,की यंदाच्या दिवाळीमध्ये ग्राहकांनी मोटारसायकल, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अशा अन्य खरेदीला प्राधान्य दिल्यामुळे कपडय़ांच्या बाजारपेठेमध्ये विक्री कमी झाली असण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या खरेदीची सुरुवात घटस्थापना आणि दसऱ्यापासून होत असते. यंदा ते वातावरण जाणवले नाही.

‘रंगवर्षां’चे राजेंद्र बिहाणी म्हणाले,‘ दिवाळीचा हंगाम असल्यावर बाजारपेठ गजबजलेली असते. मात्र, (पान महाप्रदेश)

गेल्या वर्षीपासून हे चित्र बदललेले दिसून येत आहे. यंदा व्यापारामध्ये ३० ते ४० टक्के फरक पडला आहे. दुष्काळाचे वातावरणही त्याला कारणीभूत आहे.’

‘हस्तकला’चे संजय शेवानी म्हणाले,‘ऑनलाईन खरेदीकडे असलेला ग्राहकांचा कल यंदा वाढल्याचे दिसून येत आहे. नोकरदारांना उशिरा मिळालेला बोनसही बाजारातील मंदीला कारणीभूत ठरत आहे. ‘रुद्राणी सारीज’चे प्रदीप प्रयाग यांनीही या माहितीला दुजोरा दिला.

‘कोठारी व्हिल्स’च्या दालनाच्या विक्री विभागातील व्यवस्थापक (फ्लोअर) सागर म्हणाले,की नागरिक वाहनांबाबत चौकशी करतात मात्र विम्यामुळे वाहनांच्या किमतीही वाढल्या असल्याने त्यातील अनेक जण खरेदी करीत नाहीत.

‘सुयोग डिजिटल’चे आदित्य मालू म्हणाले,की ग्राहकाने दुकानात येऊन खरेदी केली नाही, तरीही हरकत नाही. मात्र, सध्या ग्राहक दुकानातही येत नाहीत. सातत्याने बदलणारी सरकारी धोरणे त्यासाठी कारणीभूत असावीत असे वाटते. बदलत्या धोरणांमुळे ग्राहक संभ्रमावस्थेत आहे. त्याचा विपरित परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर झाला आहे.

‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक म्हणाले, सोन्याच्या बाजारपेठेत गुंतवणूक रूपाने केल्या जाणाऱ्या सोने खरेदीला मागणी मंदावली आहे. पूर्वी ग्राहक वेढणी किंवा तत्सम पद्धतीने सोने खरेदी करून नंतर ते दागिन्यात घडवत असत. त्या वेळी एक टक्का व्हॅटप्रमाणे दोन व्यवहारांसाठी एकूण दोन टक्के व्हॅट भरावा लागत होता. आता तीन टक्के जीएसटी असल्याने सोने खरेदी आणि दागिन्यांत रुपांतर करण्यासाठी दोन व्यवहारांत सहा टक्के वस्तू आणि सेवा कर भरावा लागतो. ग्राहकांना हे परवडणारे नाही. सोन्यावर आयात शुल्क आणि वस्तू व सेवा कर धरून १३ टक्के कर भारताशिवाय कुठेही नाही. त्यामुळे गुंतवणूक रुपाने केल्या जाणाऱ्या सोने खरेदीला मागणी घटली असून, दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांचा भर आहे.

वाहन खरेदीला फटका

वाहन विक्रीलाही यंदाच्या दिवाळीत मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. साधारणत: दिवाळीतील मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणावर वाहनांची खरेदी होत असते. मात्र, यंदा दसऱ्यापासूनच दुचाकी आणि चारचाकी दोन्हीही प्रकारच्या वाहनांच्या विक्रीमध्ये मोठय़ा प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येते. दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात एकूण वाहन खरेदी मागील वर्षांच्या तुलनेत तब्बल ४४ टक्क्य़ांनी कमी झाली. त्यापाठोपाठ आता दिवाळीतही वाहनांचा बाजार काहीसा थंड असल्याचे जाणवते आहे.

फर्निचर व्यवसायातही निरुत्साह

‘निर्मिती फर्निचर’चे शेखर आचार्य म्हणाले,की  पाच वर्षांची तुलना केल्यास गेल्या दोन वर्षांपासून व्यवसायात मंदी आहे. दोन वर्षांपूर्वी मोठय़ा प्रमाणात संपूर्ण घरासाठी फर्निचर घेण्याकडे ग्राहकांचा कल होता. तो गेल्या दोन वर्षांपासून दिसून येत नाही. फर्निचरचा व्यवसाय रिअल इस्टेटशी संबंधित आहे. नवीन घर घेतल्यानंतर त्यामध्ये नवीन फर्निचर घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. मात्र, बांधकाम व्यवसायात मंदी असल्याने त्याचा परिणाम फर्निचर व्यवसायावर निश्चित झाला आहे. सध्या सर्वसाधारणपणे संपूर्ण बाजारपेठेत मंदीसदृश्य वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button