म्हाळुंगेत कामगारांचा टाॅवेलने गळा आवळून खून

पिंपरी – बांधकाम कामगाराचे सहकारी कामगारांसोबत भांडण झाल्याने त्याचा टॉवेलने गळा आवळून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २) रात्रीच्या सुमारास म्हाळुंगे चौकाजवळ पुराणिक लेबर कॅम्प येथे घडली.
रवींद्र साहू (वय २६, रा. म्हाळुंगे, लेबर कॅम्प. मूळ रा. झारखंड) असे खून झालेल्या बांदकाम कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र मूळचा झारखंडचा असून तो म्हाळुंगे चौकाजवळ पुराणिक बिल्डरच्या एका बांधकाम साईटवर कामाला होता. तसेच त्या साईटच्या लेबर कॅम्पमध्ये तो राहत होता. गुरुवारी रात्री काही किरकोळ कारणावरुन रवींद्र याचे त्याच्या बांधकाम कामगार सहकाऱ्यांशी भांडण झाले. आणि त्यानंतर लहान टॉवेलच्या सहाय्याने त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. आज (शुक्रवार) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून रवींद्रचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.