मोफत वाय-फाय सेवा देणारे दिब्रुगड ४०० वे स्टेशन

दिब्रुगड : आसाममधील दिब्रुगड रेल्वे स्टेशनवर मोफत व्हाय-फाय सेवा सुरु झाली. अशी सेवा उपलब्ध असलेले देशातील हे ४०० वे रेल्वे स्टेशन ठरले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांनी व गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी या ‘रेलवायर’ व्हाय-फाय सेवेसाठी भारतीय रेल्वे व गूगल यांच्यात करार झाल्याची घोषणा केली होती. ही सेवा ४०० स्टेशनवर सुरु करण्याचे कंत्राट गूगलला दिले होते व त्यासाठी यंदाच्या डिसेंबरपर्यंतची मुदत होती. त्याच्या सहा महिने आधीच दिब्रुगड या ४०० व्या स्टेशनवर ही सेवा उपलब्ध केली गेली. या सेवेसाठी रेल्वेने ‘रेलटेल’ नावाची स्वतंत्र उपकंपनी सुरु केली आहे. त्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार दररोज सुमारे आठ कोटी लोक या सेवाचा लाभ घेतात.
मुळात रेल्वे प्रवाशांच्या लाभासाठी ही सेवा सुरु केली गेली. महानगरांपेक्षा लहान शहरांमध्ये या सेवेचा अधिक उपयोग करून घेतला जात असल्याचेही आढळून आले. दिब्रुगड स्टेशनवर झालेल्या कार्यक्रमात गूगल इंडियाचे के. सुरी म्हणाले की, रेल्वेसोबतचे आमचे कंत्राट पूर्ण झाले, ही सेवा पुढील पाच वर्षे सुरु राहील. आता टेलिकॉम कंपन्यांसोबत भागीदारी करून अशाच प्रकारची सेवा शहरांच्या अन्य सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.