breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

‘मोदी सरकार जात नाही, तोपर्यंत शर्ट घालणार नाही’

शरद पवार यांच्या सभेत कांदा उत्पादकाची प्रतिज्ञा

नाशिक : जोपर्यंत मोदी सरकार जाणार नाही, तोपर्यंत शर्ट घालणार नाही, अशी प्रतिज्ञा येवला तालुक्यातील युवा कांदा उत्पादकाने बुधवारी निफाड येथे राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर घेतली.  दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत हा प्रकार घडला.

सभेसाठी शरद पवार उभे राहताच गर्दीतून कृष्णा डोंगरे हा युवा कांदा उत्पादक व्यासपीठावर चढला. कांद्याला भाव मिळत नसल्याने अर्धनग्न आंदोलन करत असल्याचे त्याने सांगितले. पिंपळगाव येथे झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊ नये म्हणून आदल्या दिवशीच पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले. सभा झाल्यानंतर आपली सुटका करण्यात आली.

जोवर हे सरकार बदलणार नाही, तोवर शर्ट घालणार नसल्याचे डोंगरे यांनी सांगितले. पवार यांना त्याने निवेदनही दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबंधिताला दिलासा देत २६ मेनंतर आपण तुला शर्ट पाठवू, असे सांगितल्यानंतर डोंगरे खाली उतरले.

दरम्यान, या सभेत पवार यांनी कृषिमालास भाव नसल्याने आणि त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड करता न आल्याने २०१७-१९ या कालावधीत राज्यात ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. मोदी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. नाशिकमध्ये सभा घेऊनही ते द्राक्ष, कांदा प्रक्रियेबाबत काहीही बोलले नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतमालाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्याला दिवाळी साजरी करता येते. शेतमालास भाव नसेल तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो, याकडे पवार यांनी लक्ष वेधत आपल्या कृषिमंत्रीपदाच्या कार्यकाळात कृषिमालास चांगला भाव मिळण्यासाठी घेतलेले निर्णय कथन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button