मोदी सरकारने कामगार देशोधडीला लावला – माजी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे

पिंपरी – भाजप-शिवसेनेने सत्तेत येण्यापुर्वी अनेक खोटी आश्वासने जनतेला दिली. त्याच आश्वासनावर युतीचे सरकार सत्तेत आले. वर्षाला दोन कोटी रोजगार देतो म्हणून सांगणा-या सरकारने दहा लाख रोजगार दिला नाही. कामगारांच्या हिताचे निर्णय न घेता, कंपन्याच्या मालकांच्या हितासाठी हे सरकार काम करीत होते. त्यामुळे कामगार वर्गात प्रचंड संताप निर्माण झाला असून पाच वर्षात कोट्यवधी कामगार, तरुण देशोधडीला लागले आहेत. तेच लोक आता मोदी सरकार सत्तेवरुन खाली हटवेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी पिंपरी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या वतीने पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित करण्यात आलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, कामगारनेते कैलास कदम आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, मोदी सरकारने पाच वर्षात जे निर्णय घेतले आहेत ते सगळे फसले आहेत. यामुळे याबाबत बोलण्याचे ते टाळतात आणि इतर मुद्द्यांवर बोलून जनतेची फसवणूक करतात. नोटबंदी, जीएसटीमुळे सामान्य जनतेचा काय फायदा झाला हे त्यांनी सांगावे. देशात रोजगार आणण्याच्या बाता केल्या मात्र रोजगार कमी होत आहेत व कंपन्या बंद पडत आहेत. हेच सरकार आले तर एकही कंत्राटी कामगार कायमस्वरूपी होणार नाही. कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसणार आहे. देशाच्या नावाने मते मागायची आणि पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खायची अशी टीकाही त्यांनीही यावेळी केली.