मोदींमुळे दहशतवाद्यांना मोकळं रान: राहुल गांधी

मी खोटी आश्वासनं देत नाही, असे सांगत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. मध्य प्रदेशमध्ये सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राफेल करारासंदर्भात सीबीआयचे संचालक चौकशी करणार होते, यातून ‘दूध का दूध, पानी का पानी’ झाले असते. ‘चौकीदार’ चोर आहेत हे देशाला कळलं असतं. त्यामुळेच मोदींनी रात्री दोन वाजता सीबीआयच्या संचालकांना हटवले, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सोमवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. उज्जैनमधील मंदिरात दर्शन घेतल्यावर राहुल गांधींनी सभा घेतली. या सभेत त्यांनी नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारवर टीका केली. मध्य प्रदेशमधील कुंभ मेळ्यात भ्रष्टाचार झाला असून त्याच्या सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. पण सीबीआय चौकशी कशी करणार?, त्यांच्या संचालकांना रात्री दोन वाजता पदावरुन हटवले जाते, असे त्यांनी सांगितले.
सीबीआयचे संचालक राफेल करारातील घोटाळ्याची चौकशी सुरु करणार होते. यातून सत्य जनतेसमोर आले असते. यामुळे घाबरलेल्या चौकीदाराने तडकाफडकी संचालकांची बदली केली. ज्या दिवशी चौकशीला सुरुवात झाली असती त्याच दिवशी देशाला चौकीदार चोर आहे हे समजले असते, असा दावा त्यांनी केला.