महाराष्ट्र

मोदींनी हिंमत दाखविण्याची हीच खरी वेळ – अशोक चव्हाण

नांदेड : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या खोट्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावली. त्यामुळे पाकिस्तान सरकार विरुद्धच्या महाराष्ट्रातील जनतेच्या संतप्त भावना स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला कळविणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 56 इंची छातीची हिंमत आता दाखविण्याची हीच खरी वेळ असल्याचे आव्हान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिले.
कॉंग्रेसच्या वतीने वजिराबाद भागातील मुथा चौक येथे चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. या वेळी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा निषेध करत पाकिस्तानचा झेंडा जाळला तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या प्रतिमेचे दहन केले त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते. हेरगिरी केल्याचा कुठलाही ठोस पुरावा नसताना पाकिस्तान सरकार कुलभूषण जाधव यांना तुरुंगात डांबते तसेच त्यांना फाशीची शिक्षा ठोठावते, ही अतिशय गंभीर घटना असून भारत सरकारने वेळीच ठोस कारवाई करण्याची गरज आहे. त्याचबरोबर नांदेडच नव्हे तर मराठवाडा व संबंध महाराष्ट्रातील जनतेच्या भावना किती तीव्र आहेत, हे दाखविण्यासाठी कॉंग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. कागदोपत्री ठोस पुरावे मांडून कुलभूषण जाधव यांची पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानच्या तावडीतून सुटका करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, नरेंद्र चव्हाण, सभापती बी. आर. कदम, सभापती मंगला बोकारे, सभापती सुखदेव जाधव, उपसभापती प्रा. ललिता शिंदे बोकारे, नगरसेवक विजय येवनकर, श्‍याम दरकू, पप्पू पाटील कोंडेकर, किशोर स्वामी, आनंद चव्हाण, दीपक पाटील, अविनाश कदम, साबेर चाऊस, प्रा. कैलास राठोड, डॉ. दिनेश निखाते, उमेश पवळे, संजय मोरे, संजय देशमुख लहानकर, राजू येनम, सुषमा गहेरवार, सुमती व्याहाळकर, अपर्णा नेरलकर, पुष्पा शर्मा, जयस्वाल, पुनिता रावत, साहेबराव धनगे, गंगाप्रसाद काकडे, राजू जैन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button