मोदींना संपवण्याचा नक्षलींचा कट, राजीव गांधींसारखीच करायची होती हत्या?; ‘त्या’ ई-मेलमुळे खळबळ

पुणे – कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात नक्षलवाद्यांचा संबंध होता की नाही?, या दृष्टीकोनातून तपास सुरू असतानाच आणखी एक नवीन गौप्यस्फोट करणारी व धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांनी पैसा पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी माओवाद्यांशी संबंधित असलेल्या पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यातून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता मिळालेली नवीन माहिती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित असल्यानं खळबळ उडाली आहे.
याबाबत इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, या पाच जणांविरोधात अटकेची कारवाई केल्यानंतर पोलिसांना एक ई-मेल मिळाला आहे. यामध्ये नक्षलवाद्यांकडून माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडासारखं कृत्य पुन्हा घडवून आणण्यासाठी योजना आखण्यात येत असलेला मजकूर आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात याबाबत माहिती दिली. यावरुन नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, उज्ज्वला पवार यांनी कोर्टात तशी शंका स्पष्टपणे नाव पंतप्रधान मोदींचे घेऊन व्यक्त केलेली नाही. मात्र ई-मेलमध्ये आत्मघातकी हल्ल्याचा संदर्भ असून चार लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेलं एम 4 हे शस्त्राच्या खरेदी करण्याची योजना असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, बुधवारी(6 जून) पुणे पोलिसांनी मुंबई, नागपूर, दिल्लीतून सुधीर ढवळे, अॅड. सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, दीपक राऊत आणि रोना विल्सन यांना अटक केली. माआवोदी संघटनेशी संबंधित सुधीर ढवळे यांच्यासह अटक केलेल्या पाचही जणांचा बंदी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट) या संघटनेसोबत घनिष्ठ संबंध दर्शवणारे दस्ताऐवज प्राप्त झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. यामध्ये राजीव गांधी हत्याकांडासारखं आणखी घातक कृत्य करण्याची योजना सुरू असल्याचे याद्वारे आढळून आले.