मोदींचा १ मिनिट वाचवण्यासाठी १०० झाडांची होणार कत्तल ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला छत्तीसगडच्या भिलाईचा दौरा करणार आहेत. नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात अडथळा ठरत असल्याने जवळपास १०० झाडांची कत्तल केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदी रायपूरहून हेलिकॉप्टरने भिलाई येथे मैदानात उतरतील. त्यानंतर भिलाई स्टील प्लांटचा दौरा करणार आहेत.
सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्त्याचा वापर करत आधी डीपीएस चौकातून फॉरेस्ट अॅव्हेन्यू आणि नंतर बीएसपी मुख्य गेटपर्यंत जातील असं ठरलं होतं. मात्र पंतप्रधानांना रस्त्याने प्रवास करावा लागू नये आणि हेलिकॉप्टर मार्गे थेट कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास मदत व्हावी यासाठी भिलाई निवासच्या मागील बाजूस असणारी १०० झाडे कापण्याची तयारी केली जात आहे. भिलाई प्रशासन ज्या झाडांची कत्तल करण्याची योजना आखत आहे तो भाग आधीच बफर झोनमध्ये येतो. या ठिकाणी झाडांची कत्तल झाल्यास पर्यावरणाला प्रचंड मोठी हानी होण्याची शक्यता आहे.