मॉडेलिंगचेचे अमिष दाखवून तरूणीला 2 लाखांचा गंडा

पुणे – पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील तरूणीची मॉडेलिंगसाठी फोटोशूट करून देण्याच्या बहाण्याने 1 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मॉडेलिंगसाठी पैसे घेणाऱ्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सायबर क्राईम सेलच्या पथकाने युवराज बाळासाहेब भोसले (वय-26, रा. तळेगाव दाभाडे, पुणे) यास अटक केली.
याप्रकरणी 22 वर्षीय महाविद्यालयीन तरूणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणीच्या बहिणीला युवराज भोसले याने भेटून मी फोटोग्राफरचे काम करत असून फोटोशूट करुन देतो, असे सांगितले होते. तुमचे फोटोशूट करावयाचे असेल तर, 2500 रुपये प्रत्येकी भरावयास लागतील. फोटोशूटकरिता 14 जणींचा ग्रुप आवश्यक असून माझ्याकडे दहा मुली अगोदरच आहेत. आणखी चारजणींची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार सदर तरूणी व तिच्या मैत्रिणी यांनी फोटोशूटकरिता 7500 रुपये भोसले यास दिले. त्यानंतर एक आठवडा होऊनही त्याने तरुणींचे फोटोशूट केले नाही. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने माझ्यावर आयकर विभागाचा छापा पडला असून मी अडचणीत आहे. मला आणखी पैशांची गरज आहे, अशी विनवणी केली. त्यानुसार त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीने त्याला वेळोवेळी 1 लाख 78 हजार रुपये दिले. मात्र, त्यानंतर सदर तरुणीशी पुन्हा कोणत्याही प्रकारचा संर्पक न करता अथवा तिचे पैसे परत न करता तिची फसवणुक केली.