मेट्रो पॅन सेगमेंट निर्मितीच्या कामाला वेग
पिंपरी – कासारवाडी येथील कास्टिंग यार्डमध्ये स्वतंत्र सेगमेंट तयार केले जातात. ते सेगमेंट मेट्रो मार्गावर बसविण्यात येतात. 50 पॅनपूर्ण करण्यासाठी लागणारे सेगमेंट कास्टिंग यार्डमध्ये तयार आहेत. यामुळे मेट्रोच्या कामाला आणखी वेग येणार आहे, असा दावा पुणे मेट्रोचे मुख्य प्रकल्प अधिकारी (रिच 2) गौतम बि-हाडे यांनी केला.
पुणे मेट्रोच्या फुगेवाडी कार्यालयात आयोजित संवादात ते बोलत होते. ते म्हणाले की, खराळवाडी येथे पॅनसेगमेंट उभारणीचे काम सुरु असून पाच पॅन पूर्ण करण्यात आले आहेत. कासारवाडी येथील कास्टिंग यार्डमध्ये सेंगमेंट निर्मितीचे काम वेगात सुरु आहे. सध्या 431 सेगमेंट तयार झाले आहेत. 50 पॅन पूर्ण करण्यासाठी हे सेगमेंट पुरतील. खराळवाडी पासून पहिला लॉन्चर बसविण्यात आला आहे. 15 मे च्या दरम्यान आणखी एक लॉन्चर बसविण्यात येणार आहे. यामुळे आतापेक्षा दुप्पट वेगात मेट्रोचे काम होईल. प्रत्येक महिन्याला सुमारे 6 पॅन पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
खराळवाडी ते पिंपरी-चिंचवड महापालिका दरम्यान काम सुरु झाले आहे. त्यासाठी रस्त्यामध्ये बॅरीगेट लावण्यात आले आहेत. कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ मेट्रो रेल्वे स्थानकाच्या बाजूला वळणार आहे. त्या वळणाच्या पिलरचे काम आठवडाभरात सुरु होणार आहे. भोसरी, सांगवी आणि पुणे शहराकडून येणारी वाहने त्या रस्त्यावरून जात असल्याने या मार्गावर काम सुरु करताना वाहतुकीचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मेट्रोचे पिलर येणार आहेत. त्यासाठी वाहतूक विभागाची परवानगी घेण्याचे काम सुरु आहे.
वल्लभ नगर मेट्रो स्थानकाचे काम देखील वेगात सुरु आहे. मेट्रो स्टेशनसाठी एकूण 48 फाउंडेशन बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी 20 फाउंडेशन पूर्ण झाले आहेत. तर 10 सेंटर फाउंडेशन उभे करण्यात येणार आहेत. त्यापैकी 8 सेंटर फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो स्टेशनसाठी लागणारे गटर किवळे येथील कास्टिंग यार्डमध्ये तयार करण्यात येत आहेत. या कास्टिंग यार्डमध्ये मेट्रो स्टेशनच्या पायाचे आणि छताचे असे दोन्हीही गटर तयार करण्यात येणार आहेत.