‘मेक इन इंडिया’ महाराष्ट्राला शिकवू नये, राज ठाकरेंनी टोचले मोदींचे कान

मुंबई : इचलकरंजीमध्ये १९०४ साली यंत्रमाग सुरु झाला, १९७० साली आताच्या नॅनोसारखी गाडी जिचं नाव मीरा होतं ती इथे सुरु झाली. इतकी हरहुन्नरी माणसं इथे राज्यात असताना आम्हाला मेक इन इंडिया शिकवताय ? सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला. इचलकरंजी येथे मंगळवारी सायंकाळी आयोजित सभेत ते बोलत होते. खोटे बोलून, खोटी आश्वासने देऊन मोदी आणि अमित शहांनी देशाच्या थोबाडीत मारली अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
महात्मा गांधी यांनी सुत काढण्याआधीच इचलकरंजी शहराने सुत काढायला सुरुवात केली होती हा या शहराचा इतिहास आहे. नॅनो गाडी रतन टाटा यांनी काढली मात्र त्याआधी १९७० साली इचलकरंजी येथील माणसाने मिरा नावाची सर्वात छोटी गाडी काढली. इथे हरहुन्नरी लोकं असताना त्यांना मेक इन इंडिया शिकवता? महाराष्ट्र नेहमीच प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसांनी अटकेपार झेंडे रोवले आहेत. आजही देशात औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच आहे. त्यामुळे मेक इन इंडिया महाराष्ट्राला शिकवू नये असा टोला राज यांनी यावेळी लगावला.
२०१४च्या निवडणुकीत लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवणारे, आश्वासनं देणारे मोदी विषयाला सोडून बोल्त असल्याची टीका राज यांनी केली. मोदी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत, पत्रकार परिषद घेत नाहीत, पत्रकारांना ते घाबरतात. गेल्या निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांवलर बोलत नाही. आता केवळ पाकिस्तान-पाकिस्तान सुरू आहे. आमचे जवान सीमेवर हकनाक शहीद होतात. मात्र त्याचं यांना काहीही सोयरसुतक नाही. यांना केवळ जवानांवरुन राजकारण करायचं आहे, अशा शब्दांमध्ये राज यांनी पंतप्रधानांवर तोफ डागली.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह नावाचं देशावर आलेलं संकट दूर व्हावं म्हणून मी प्रचार करतोय. भारतीय जनता पक्षाने काळ्या पैशाबद्दल बोलूच नये. कारण २०१४ ते २०१९ च्या काळात निवडणुका जिंकण्यासाठी ह्या पक्षाने वारेमाप पैसा खर्च केला तो कुठून आला? काही शे कोटी खोट्या नोटांसाठी तुम्ही अर्थव्यवस्थेतल्या १६ लाख कोटी नोटा काढून घेतल्यात. नोटबंदीचा हेतू स्वच्छ नव्हता. नोटबंदीमुळे कोट्यवधी नोकऱ्या गेल्या, लोकं देशोधडीला लागले, इथल्या इचलकरंजीमधले यंत्रमाग कामगार देशोधडीला लागले पंतप्रधान नोटबंदी, जीएसटी, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, नमामि गंगे बद्दल का बोलत नाहीयेत? जवानांच्या नावावर मतं का मागताय? असा सवाल राज यांनी यावेळी केला.
राज यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
🔸 मी निवडणूक लढवत नाही, माझा उमेदवार नाही तरीही भाजपवाले फडफडत आहेत, निवडणूक आयोगाला विचारत आहेत कुठल्या खात्यात खर्च मोजायचा. कुठल्या खात्यात म्हणजे आमच्या खात्यात. त्या पेक्षा मी विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या.
🔸 मी ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतोय त्याचा एक फायदा लक्षात घ्या की ह्या पुढे कुठलाही राजकारणी खोटं बोलणार नाही तुम्हाला गृहीत धरणार नाही कारण ते खोटं बोलले तर अशा क्लिप्स बाहेर येणार, लोक प्रश्न विचारणार
🔸 देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्त्तीनी बाहेर येऊन पत्रकार परिषद घेऊन लोकशाही धोक्यात आहे हे सांगितलं. कारण जस्टीस लोया ह्यांच्या मृत्यूबाबत त्यांना काही शंका होत्या आणि त्याचा संबंध अमित शाह ह्यांच्याशी होता.
🔸 रिझर्व्ह बँकेच्या दोन गव्हर्नर्सनी राजीनामा दिला. नोटबंदी करताना आरबीआयच्या गव्हर्नंरना विश्वासात नाही घेतलं, अर्थमंत्र्याला विश्वासात घेतलं नाही, मंत्रिमंडळाला विश्वासात घेतला नाही. एका माणसाला झटका आला आणि त्यांनी नोटा बंद करून टाकल्या.
🔸 देशाबाहेरचा काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा-पंधरा लाख रुपये जमा करेन असं पंतप्रधान म्हणाले होते, काय झालं ह्या आश्वासनाच?
🔸 देशातबाहेरचा काळा पैसा आणण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करू, गरज पडली तर कायदे बदलू, आणि कसंही करून देशात काळा पैसा आणू, आणि नोकरदारांना त्यांच्या प्रामाणिकतेसाठी त्यातला काही भाग देऊ, असं मोदी म्हणाले होते आणि अमित शाह सत्तेत आल्यावर म्हणाले हा तर चुनावी जुमला होता.
🔸 बेरोजगार तरुण नोकरीचं शोधात फिरतोय आणि हे येणार, तुम्हाला स्वप्न दाखवणार आणि पुन्हा तुमच्या पदरी निराशा. किती काळ चालू राहणार आहे हे सगळं ?
🔸 गंगेच्या स्वच्छतेसाठी २० हजार कोटी खर्च केले ना, मग कुठे झाली स्वच्छ गंगा? कुठे गेले २० हजार कोटी रुपये?
🔸 बिहारमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले कि, “स्वच्छ भारत अभियानात आम्ही एका आठवड्यात ८ लाख ५० हजार शौचालयं बांधली”. किती थापा माराल? आकडा काढून बघा ८ लाख ५० हजार शौचालयं १ आठवड्यात म्हणजे १ मिनिटात ८४ शौचालयं आणि ५ सेकंदात ७ शौचालयं बांधली जातील. हा विक्रम बांधकामांचा कि थापांचा?
🔸 नरेंद्र मोदी हे ह्या देशाच्या इतिहासातील एकमेव पंतप्रधान आहेत जे माध्यमांना एकदाही सामोरे गेले नाहीत, पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जायला तयार नाहीत
🔸 बालाकोटच्या एअरस्ट्राईक मध्ये २५० माणसं मारली, असं अमित शाह म्हणाले. अमित शाह गेले होते का को-पायलट म्हणून? जो मदरसा उध्वस्त केला असा दावा ह्यांनी केला, तो मदरसा अजून आहे तसा आहे, हे जगभरातील माध्यमांनी दाखवलंय.
🔸 पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान म्हणतात की मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हायला हवे. शत्रूराष्ट्राचा पंतप्रधान हा आपल्या देशात कोण निवडून यावा हे का बोलतोय? काय कटकारस्थान आहे ह्या मागे?
🔸 शहीद जवानांच्या नावावर मतं मागताना लाज नाही वाटत पंतप्रधानांना? सैनिकापेक्षा व्यापारी हा जास्त शूर असतो असं पंतप्रधान म्हणाले..ह्या वाक्यातून ह्यांच्या मनात सैनिकांबद्दल काय भावना आहेत हे कळतं.
🔸 सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, रिझर्व्ह बँक ह्या सारख्या स्वायत्त संस्थांमध्ये हस्तक्षेप करून ह्यांनी लोकशाही धोक्यात आणली. हेच १९३० ला जर्मनीत हिटलर करत होता. प्रचारासाठी हिटलर फिल्म काढायचे आणि नेमकं हेच मोदी आज करत आहेत.
बेसावध राहू नका. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की २०१४ ला झालं ते झालं. एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जाऊया. ह्या देशातील राजकीय क्षितिजावरून मोदी आणि शाह ह्यांना आपल्याला हटवायचं आहे म्हणून आपल्याला मतदान करायचं आहे.