breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’

कोल्हापूर : रस्ते अपघातात जखमी होऊन उपचार सुरू असताना ब्रेनडेड झालेल्या निगवे खालसा (ता.करवीर) येथील तरुण अमर पाटील यांचे हृदय, यकृत आणि दोन किडनी ‘दान’ करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. कोल्हापुरात पहिल्यांदाच घडलेल्या ‘ग्रीन कॉरिडोर’मुळे राज्यातील चार वेगवेगळ्या ठिकाणच्या रुग्णांना खर्‍या अर्थाने जीवदान मिळणार आहे.

मुंबई (मुलुंड) येथील फोर्टिस रुग्णालयात हृदयावर, तर पुणे (बाणेर) ज्युपिटर रुग्णालयात लिव्हर आणि एका किडनीचे प्रत्यारोपण होणार आहे. एका किडनीचे प्रत्यारोपण कोल्हापुरातील अ‍ॅस्टर आधारमधील रुग्णावर करण्यात आले.

निगवे खालसा येथील अमर पांडुरंग पाटील (वय 31) यांचा 30 एप्रिल रोजी येवती (ता. करवीर) येथे रस्ते अपघात झाला. त्यांच्या दुचाकीस एका टेम्पोने धडक दिली होती. यात ते गंभीर जखमी झाले. नातेवाइकांनी त्यांना तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले; पण अमर उपचारास प्रतिसाद देत नसल्याने 30 एप्रिल रोजी त्यांना अ‍ॅस्टर आधारमध्ये हलविण्यात आले. मेंदूला जबर मार लागल्याने उपचार सुरू असताना अमरचा ब्रेनडेड झाला. डॉक्टरांनी याची कल्पना नातेवाइकांना दिली. पाटील परिवाराने अमर यांचे हृदय, लिव्हर आणि दोन किडनी दान करण्याचे ठरविले. सर्व प्रक्रिया अ‍ॅस्टर आधारचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उल्हास दामले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.

आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प अमर यांनी नातेवाइकांना बोलून दाखविला होता. हृदय एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला शनिवारी (दि. 5) दुपारी साडेचार वाजता पाठविण्यात आले. तर एक किडनी सोलापूर येथील यशोधर रुग्णालयातील रुग्णास प्रत्यारोपणासाठी पाठविली जाणार होती; पण संबंधित रुग्णास किडनी न जुळल्याने ती किडनी व लिव्हर पुणे (बाणेर) येथील ज्युपिटर रुग्णालयातील गरजू रुग्णांच्या प्रत्यारोपणासाठी सायंकाळी पाच वाजता रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आली.

दरम्यान, अ‍ॅस्टर आधार ते ज्युपिटर रुग्णालय (पुणे) व अ‍ॅस्टर आधार ते उजळाईवाडी विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडोरचा अवलंब करण्यात आला. चार तासांत प्रत्यारोपण करावयाचे असल्याने डॉक्टरांचे पथक, पोलिस, जिल्हा प्रशासन, नातेवाईक यांची सकाळपासूनच तयारी सुरू होती. दुपारी सव्वाचारच्या सुमारास हृदय एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला, तर किडनी व लिव्हर पाच वाजता रुग्णवाहिकेतून पुण्याला नेण्यात आले. यामुळे  अवयवदान चळवळीस बळ मिळाले आहे. अमर पाटील यांच्या पश्‍चात पत्नी शीतल, मुलगी अस्मिता, मुलगा प्रेम, वडील पांडुरंग, बहीण वर्षा, भाऊ सचिन व मनीष असा परिवार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button