मुख्यमंत्र्यांच्या सभेची नेत्यांना धास्ती; पदाधिकारी नियोजनात व्यग्र

पिंपरी (महा-ई-न्यूज – निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येत्या शनिवारी (दि. 3) जाहीर सभा होणार असून भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. प्रत्येक पदाधिका-यावर सभेच्या नियोजनाची जबाबदारी सोपविली असून ती पूर्ण झाल्याची माहिती काही पदाधिका-यांनी दिली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्वतः लक्ष घालून कोणत्याही परिस्थितीत सभेचे नियोजन बिघडता कामा नये, अशा सूचना शहरातल्या पदाधिका-यांना दिल्या आहेत. मैदानावर कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार आहेत. प्रशस्त पार्कींगची व्यवस्था केली आहे. एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. याशिवाय, शहरात सर्वत्र भाजपचे झेंडे लावण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांचे होर्डींग्ज झळकणार आहेत. हे नियोजन महापालिकेतील पक्षाच्या पदाधिका-यांवर सोपविले आहे. त्यांनी ते चोखपणे पार पाडले आहे.
मुख्यमंत्र्यांची ही सभा आमदार जगताप यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बैठकीच्या नियोजनावरून जगताप यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच झापले होते. त्यामुळे आता या बैठकीला हलगरजीपणा चालणार नाही, अशा सक्त सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. सभेसाठी धिंग्रा मैदानावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होणार आहे. मैदानाबाहेरही कार्यकर्त्यांना बसता येईल किंवा उभारून सभा पाहता येईल, अशी व्यवस्था राहणार आहे.