मुख्यमंत्र्यांना तूर, दूध, साखर पाठवून शेतकऱ्यांचे आंदोलन

अहमदनगर : शेतकरी संघर्ष समितीने जाहीर केल्या प्रमाणे आज अकोले येथे ताहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना तूर, दूध, साखर भेट पाठवून तीव्र आंदोलन केले. अकोले येथील तहसील कार्यालयात घोषणा देत घुसलेल्या कार्यकर्त्यांनी सोबत आणलेली तूर, साखर व दुध तहसीलदारांच्या टेबलवर मांडत आंदोलनाला सुरुवात केली. तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांना तूर वाटत यावेळी तूर, साखर व दुध आयतीचा निषेध करण्यात आला.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट भाव व दुधाला रास्त भावाचा हक्क यासाठी सुरु असलेल्या लढ्याला निर्णायक टप्प्यात घेऊन जाण्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनासाठी तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. देशात तूर मोठ्या प्रमाणात पडून असल्याने तुरीचे भाव कोसळलेत. साखर पडून असल्याने उसाचे भाव कोसळलेत. राज्यात दूध अतिरिक्त झाल्याने दुधाला भाव नाही. अशा परिस्थितीतही भाजप सरकार देशात मोझॅम्बीकची तूर व पाकिस्तानची साखर आयात करत आहे.
राज्यात दुधाचा महापूर असताना राज्यातील सरकार राज्यात गुजरात व कर्नाटकच्या दूध कंपन्यांना पायघड्या टाकून राज्यात दुधाची आयात करत आहे. सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात संघर्ष समितीने पाच जून ते नऊ जून या काळात राज्यभर तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना मोझॅम्बीकची तूर, गुजरात, कर्नाटक, आंध्राचे दूध व पाकिस्तानची साखर भेट देत आंदोलन करण्याची हाक दिली आहे. त्यानुसार आज अकोलेत हे आंदोलन करण्यात आले.