breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुख्यमंत्र्यांची निगडीतील नियोजित सभा रद्द होण्याची शक्यता

  • भाजपच्याच कार्यकर्त्याची आपलं सरकारवर तक्रार
  • पालिकेच्या त्या ठरावानुसार सभा घेण्यास बसतात निर्बंध

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भाजपच्या आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते फोडला जाणार आहे. त्याअनुषंगाने मावळ लोकसभेचे इच्छुक उमेदवार भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी निगडीत शनिवारी (दि. 3) विराट सभा घेण्याचे नियोजन केले आहे. सभेची तयारी करण्यात भाजपचे पदाधिकारी मदनलाल धिंग्रा मैदानावर रात्रीचा दिवस करीत आहेत. मात्र, शहरातील क्रिडा मैदानांवर राजकीय पक्षाचा कार्यक्रम घेण्यास निर्बंध घालण्याचा ठराव महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केला आहे. त्या ठरावानुसार धिंग्रा मैदानावरील मुख्यमंत्र्यांची नियोजित सभा रद्द होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भाजपच्याच कार्यकर्त्याने शासनाच्या “आपले सरकार” वेब पोर्टलवर तक्रार केली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आणली. आता त्यांना मावळ लोकसभा मतदार संघातून खासदारकीची निवडणूक लढवायची आहे. त्याच्या तयारीला देखील भाऊ लागले आहेत. त्याअनुषंगाने शहरात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांची बैठक घेतली. मात्र, नियोजनाअभावी आढावा बैठक फेल ठरली. आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला नारळ मावळ लोकसभा मतदार संघात फोडला जाणार असल्याचे दानवे यांनीच सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर शनिवारी विराट सभा होणार असून लाखो लोकांची उपस्थिती लाभणार आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी या मैदानावर भाजपचे पदाधिकारी, भाऊंचे कार्यकर्ते सभेच्या तयारीसाठी रात्रीचा दिवस करत आहेत. मात्र, भाजपचे कर्यकर्ते सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्र्यांच्या नियोजित सभेच्या विरोधात आपलं सरकार या पोर्टलवर तक्रार केल्याने हे नियोजन फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या स्थायी समितीने पालिकेच्या मालकीची क्रीडा मैदाने भाडेतत्वावर वापरण्यास निर्बंध घालण्याचा ठराव पारित केला आहे. असा ठराव केलेला असतानाच भाजपच्या नेत्यांकडून धिंग्रा मैदानावर पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेण्याचा घाट घातला आहे. पालिकेच्या या ठरावानुसार धिंग्रा मैदानावर पक्षाचा मेळावा घेता येत नाही, असे काळभोर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या ठरावाची सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांकडून काटेकोर अंमलबजावणी झाल्यास मुख्यमंत्र्यांची ही सभा घेता येणार नाही. त्यातच काळभोर यांची तक्रार मुख्यमंत्र्यांनी स्वतः गांभिर्याने घेतल्यास निगडीतील भाजपचा हा विराट मेळावा रद्द होऊ शकतो. त्यामुळे सभेची तयारी करत असलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांची मेहनत वाया जाणार आहे.

पक्षाचा मेळावा क्रिडा मैदानावर घेण्यास विरोध

मदनलाल धिंग्रा क्रिडा मैदानावर अनेक खेळाडू क्रिडा प्रकाराच्या कसरती करत असतात. त्यातच दिवाळीच्या सुट्ट्या देखील लागणार आहेत. सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना खेळायला मैदान खुले असणे आवश्यक बाब आहे. मात्र, भाजपच्या पदाधिका-यांनी या मैदानावर मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे. वास्तविक या मैदानावर लाखो लोक आल्यास पार्कींगचा प्रश्न उद्भवणार आहे. लोकांना ही जागा बसायला पुरणार नाही. त्यातच पालिकेत भाजपच्याच पदाधिका-यांनी यासंदर्भात केलेल्या ठरावानुसार पक्षाच्या सभा अथवा मेळावा या मैदानावर घेता येत नाहीत, अशी माहिती भाजपचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिली.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button