मुखर्जींच्या संघभेटीमुळे कॉंग्रेस नेते नाराज

नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्याचे चित्र पाहून देशाच्या वैविध्यपूर्ण आणि बहुआयामी तत्वामध्ये विश्वास असलेले लाखो कार्यकर्ते नाराज झाले आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते आनंद शर्मा यांनी ट्विटरवरून केली. मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर उपस्थित झाल्याचे फोटो बघितल्यावर त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. ज्यांची ऐकून घेण्याची, बदल स्वीकारण्याची आणि स्वतः बदलण्याची तयारी असते, त्यांच्याशी संवाद साधला जाऊ शकतो. संघाने आपला मूळ कार्यक्रम सोडून दिला असे समजता कामा नये, असेही शर्मा यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसचे अन्य वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनीही मुखर्जी यांच्या संघ मुख्यालयातील भेटीबाबत नाराजी व्यक्त केली. मुखर्जी यांच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती, असे नाराजीचे उद्गार पटेल यांनी ट्विटरवर व्यक्त केले.
कॉंग्रेस पक्षाकडून पक्षाच्या ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडीओ आणि एक लेख प्रसिद्ध केला आणि संघाच्या दृष्टीकोनाबाबतची पक्षाची भूमिका स्पष्ट केली. संघाने स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला नाही. कॉंग्रेसने या चळवळीत भाग घेतला होता. संघ संस्थापक डॉ. हेडगेवारांनी स्वयंसेवकांना स्वातंत्र्य चळवळीत भाग न घेण्याचे आदेश दिले होते, असा आरोप या लेखात केला गेला आहे. संघाचे नेते हुकुमशाही वृत्तीचे असतात, अशी टीकाही या लेखामध्ये म्हटले आहे. तर व्हिडीओमध्ये नथुराम गोडसे आणि मनुस्मृतीला दर्शवण्यात आले आहे.