मुंबई विमानतळावरील टोल वसुलीविरोधात मनसे मैदानात!

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने टोलनाका सुरू झाला आहे. खासगी गाड्यांकडून हा टोल वसूल केला जात नसला तरी व्यावसायिक गाड्यांकडून टोल वसूल केला जातो. त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित टोलवरील वसुली तात्काळ बंद करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
मुंबईत प्रवेश करण्याकरीता जे मार्ग आहेत त्या मार्गाने मुंबईत प्रवेस केल्यास टोल भरूनच प्रवेश करावा लागतो. मात्र, मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाहेरून गाडी घेऊन गेलात तर आपल्याला टोल भरावा लागतो. खासगी वाहनांकडून टोल वसूल केला जात नसला तरी व्यावसायिक वाहनांकडून १३० रुपयांचा टोल वसूल केला जातोय.
‘जीव्हीके’तर्फे अशा प्रकारचे फलक लावून वसूली केली जातेय. या टोल वसुलीचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. हा टोल अवैध असून अवैध वसुली बंद करून कंपनीविरोधात त्वरीत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आलीय. या वसुलीविरोधात मनसेकडून जनहित याचिका दाखल करण्यात आलीय.