‘मुंबई बंद’चे तीव्र पडसाद ; दगडफेक, तोडफोड, रास्ता रोको, रेल रोको

मुंबई – राज्यभर मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळले असून त्यास काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आज मुंबई, ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. तसेच पालघर, रायगड येथेही उद्या बंद पुकारण्यात आला आहे. मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने मुंबईत पार पडणाऱ्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांच्या विशेष शाखेचा या आंदोलनावर वॉच असणार आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक हालचाली सायबर सेलच्या रडारवर असणार आहेत. तर सर्व पोलीस ठाण्यांतील पोलिसांकडून विभागातील बारीक हालचालींवरही लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच काही पोलीस साध्या वेशात या आंदोलनात सहभागी होत सर्व हालचालींवर लक्ष ठेवून असणार आहेत. शहरातील सीसीटीव्हींच्या माध्यमातून नियंत्रण कक्षही अलर्टवर आहे. सोशल मीडियाच्या हालचालींवर सायबर सेलच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.
दरम्यान, शाळा, महाविद्यालये, रक्तपेढ्या, रुग्णालये, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, दूध टँकर, स्कूल बस, रेल्वे, मोनो, मेट्रो या सेवा सुरु आहेत. तर बेस्ट, एसटी, टॅक्सी, रिक्षा, खासगी वाहने, दुकाने, बाजारपेठा, उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत.