‘मुंबई- पुणे- मुंबई-3′ च्या प्रदर्शनाची तारीख निश्चित
प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘मुंबई- पुणे- मुंबई’ या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. ज्यानंतर आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख खुद्द अभिनेता स्वप्नील जोशीनेच जाहीर केली आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं…शोधण्या सुखाचा किनारा दोन वाटांना एक व्हावं लागतं !!’, अशा सुचक ओळीसह स्वप्नीलने या चित्रपटाची अवघ्या काही सेकंदांची झलक सर्वांच्या भेटीला आणली आहे.
‘गौतम’ आणि ‘गौरी’च्या सुखाचा पुढचा प्रवास २८ सप्टेंबरपासून… असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता चाहत्यांना २८ सप्टेंबरचीच प्रतिक्षा लागून राहिली असणार असेच म्हणावे लागेल. या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१० मध्ये ‘मुंबई- पुणे- मुंबई’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१५ मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.