मुंबई पदवीधर मतदार संघातून भाजपातर्फे ऍड. महेता यांना उमेदवारी

मुंबई – भाजपाने मुंबई पदविधर मतदार संघातून तरूण आणि उच्च शिक्षित विद्यार्थी चळवळीतून आलेल्या ऍड. अमित महेता यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महेता यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला.
मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांची हक्क, ग्राहक संरक्षण आणि भाडेकरून हक्कासाठी न्यायालयीन संघर्ष करणारा कार्यकर्ता म्हणून ऍड. अमित महेता सुपरिचीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आदेशाप्रमाणे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली.
निरंजन डावखरेंच्या नावाला अद्यापही मंजूरी नाही
मुंबई शिक्षक मतदारसंघातून भाजपाने अनिल देशमुख यांची उमेदवारी यापूर्वीच जाहिर केली आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांचे आव्हान राहणार आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात आलेले निरंजन डावखरे यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या नावाला अद्यापही भाजपाच्या केंद्रातील संसदीय समितीने मंजूरी दिलेली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.