breaking-newsक्रिडा

मुंबई, उपनगर, पुणे बाद फेरीत

पुणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि रत्नागिरी या बलाढय़ संघांनी सिन्नर येथे चालू असलेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेतील दोन्ही गटांची बाद फेरी गाठली आहे. सांगलीने पुरुषांमध्ये आगेकूच केली आहे.

पुरुषांमध्ये सांगलीने अहमदनगरचा ३३-१६ असा आरामात पराभव केला. नितीन मदने आणि मंगेश भिसे यांनी दमदार चढाया केल्या, तर रोहित बनेने पोलादी पकडी केल्या. मुंबईने सलग तिसऱ्या विजयाची नोंद करताना सोलापूरचा ५०-१६ असा धुव्वा उडवला. अजिंक्य कापरे आणि साहील सुशांत यांच्या चढायांनी मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. विराज उतेकरच्या पकडींनी त्याला छान साथ दिली. मुंबई उपनगरने रंगतदार लढतीत रत्नागिरीला २१-१७ असे हरवले. उपनगरच्या विजयात मनोज यादव व नामदेव इस्वलकर चमकले.

महिलांमध्ये पुण्याने साताऱ्याला ६१-२२ असे सहज पराभूत केले. पुण्याकडून सायली केरिपाळे, दीपिका जोसेफ आणि हर्षदा सोनावणे यांनी अप्रतिम खेळ केला. मुंबईने परभणीला ४१-१३ असे नामोहरम केले. मुंबईकडून मेघा कदम आणि पूजा यादवने दमदार चढाया केल्या, तर पौर्णिमा जेधेने भक्कम पकडी केल्या. मुंबई उपनगरने अहमदनगरचा ५३-२१ असा पाडाव केला. उपनगरकडून सायली जाधव आणि कोमल देवकरने दिमाखदार चढाया केल्या, तर बेबी जाधवने यशस्वी पकडी केल्या. याचप्रमाणे ठाण्यापुढे लातूरने ४५-६ अशी शरणागती पत्करली. ठाण्याकडून निकीत म्हात्रे आणि सायली परुळेकर छान खेळल्या.

बझर ऐकू येत नसल्याची पुण्याची तक्रार

व्यासपीठावरील भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी आठ सामने रद्द करण्यात आले होते. स्पध्रेच्या तिसऱ्या दिवशी व्यासपीठावरील उद्घोषणांचा त्रास पुणे-हिंगोली सामन्याला झाला. ध्वनीक्षेपकाची दिशा मैदानाच्या दिशेने असल्यामुळे तिसऱ्या चढाईचा बझर बऱ्याचदा ऐकू येत नसल्याची तक्रार पुण्याचे प्रशिक्षक निलेश लोखंडे यांनी केली. पालघर-धुळे सामना चालू असताना व्यासपीठावर नेत्यांची भाषणबाजी सुरू होती. त्यामुळे पंचांनीसुद्धा आवाज कमी करण्याची विनंती संयोजकांना केली.

शंकर काळेला दुखापत

नाशिकविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या चढाईत गुण घेण्याच्या प्रयत्नात औरंगाबादच्या शंकर काळेला दुखापत झाली. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button