Mahaenews

मुंबईतील महाविद्यालयांसाठी तीन क्‍लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव

Share On

मुंबई – महाराष्ट्रातील शैक्षणिक गुणवत्ता अधिक वाढविण्याच्या दृष्टीने रुसाच्या माध्यमातून महाराष्ट्रात क्‍लस्टर विद्यापीठाला बळकटी देण्यासाठी तीन क्‍लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मार्फत राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) कडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.

राष्ट्रीय उच्चस्तरीय शिक्षा अभियान (रुसा) च्या महाराष्ट्र राज्य रुसा कौन्सिलची बैठक आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला रुसाच्या राज्य प्रकल्प संचालक मीता राजीवलोचन यांच्यासह रुसा कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते. त्यावेळी तावडे बोलत होते. प्रस्तावित तीन क्‍लस्टर विद्यापीठांच्या प्रस्तावामध्ये एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स ऍण्ड इकॉनॉमिक्‍स, केसी कॉलेज आणि बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज (बीटीटीसी) या महाविद्यालयांचे एक क्‍लस्टर विद्यापीठ तर के. जे. सोमैय्या कॉलेज ऑफ सायन्स अण्ड कॉमर्स, के.जे. सोमैय्या कॉलेज ऑफ आर्टस ऍण्ड कॉमर्स, एस. के. सोमैय्या कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ऍण्ड कॉमर्स या तीन महाविद्यालयांचे दुसरे क्‍लस्टर विद्यापीठ तसेच एल्फिस्टन कॉलेज, इस्टिट्टयूट ऑफ सायन्स, सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स, शासकीय बीएड कॉलेज या शासकीय महाविद्यालयांचे तिसरे क्‍लस्टर विद्यापीठ असे तीन प्रस्ताव रुसा कडे पाठविण्यात येणार आहे, असे तावडे यांनी सांगितले.
तिनही क्‍लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर येथे कार्यरत प्राध्यापकांचे अनुदान हे शासनामार्फतच सुरु राहणार असे स्पष्ट करतानाच तावडे म्हणाले, या क्‍लस्टर विद्यापीठांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अधिक सुधारणा होईल, तसेच विद्याथ्रयांना चॉईस बेस्ड क्रेडीट सिस्टिमचाही लाभ मिळू शकेल, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम निवडण्यासाठी अधिक उत्तम पर्याय उपलब्ध होऊ शकतील.

Exit mobile version