breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईतील बालमृत्यू नियंत्रणात आणण्यात यश

नवजात बालकांच्या मृत्यूच्या संख्येत १२ टक्क्यांची घट

मुंबई : उपनगरीय रुग्णालयांमध्ये विशेष वैद्यकीय सल्लागारांच्या नियुक्ती, रुग्णालयात होणाऱ्या प्रसूती आणि नवजात बालकांसाठीचे कृत्रिम श्वसनयंत्रणांची वाढलेली संख्या यामुळे गेल्या तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेर पालिकेला एक वर्षांखालील बालकांचा मृत्युदर (आयएमआर) आणि नवजात बालकांचा मृत्यू कमी करण्यात यश आले आहे. २०१८ मध्ये मुंबईमधील बालकांचा मृत्युदर २५ झाला असून गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत एकने खाली आहे, तर गतवर्षांच्या तुलनेत नवजात बालकांच्या मृत्यूमध्ये १२ टक्क्य़ांनी घट झाली आहे.

मुंबई शहरामध्ये तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध असूनही जन्माला आल्यानंतर एक वर्षांच्या आत मृत्यू होणाऱ्या बालकांची संख्या लक्षणीय आहे. २०१४ साली मुंबईत एक वर्षांखालील ४८८३ बालकांच्या मृत्यूची नोंद असून त्या वेळी मृत्युदर २८ होता. बालकांचा मृत्युदर दर एक हजार बालकांमागे मोजला जातो. हा दर २०१५ मध्ये तो २६ पर्यंत खाली आला. त्यानंतरची दोन वर्षे तो स्थिर होता, तर २०१८ मध्ये तो एकने घटून २५ वर पोहोचला, असे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

उपनगरांतील रुग्णालयांमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये विशेष वैद्यकीय सल्लागारांची नियुक्ती केली आहे. बालरोग विभागामध्येही या सल्लागार उपलब्ध असल्याने बालकांची प्रकृती गंभीर असल्यास तात्काळ सेवा दिली जाते. यामुळेदेखील बालमृत्युदर कमी होण्यामध्ये मदत झाली असल्याची माहिती शीव रुग्णालयाच्या नवजात बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. जयश्री मोंडकर यांनी दिली.

गेल्या पाच वर्षांमध्ये म्हणजेच २०१४ पासून एक वर्षांखालील बालकांच्या मृत्यूमध्ये १८ टक्क्य़ांची घट झाली आहे, तर जन्मल्यापासून २८ दिवसांपर्यंतच्या नवजात बालकांच्या मृत्यूच्या संख्येतही २५ टक्क्यांची घट झाली आहे.

उपनगरीय रुग्णालयांमध्ये नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागाची सुविधा काही ठिकाणी उपलब्ध झाली आहे. तसेच कृत्रिम श्वसनयंत्रणाही वाढविण्यात आल्या आहेत. उपनगरीय रुग्णालयांमध्ये एकूण १९० विशेष वैद्यकीय सल्लागारांची नियुक्ती केली असून यातील काही नवजात बालरोग विभागामध्ये कार्यरत आहेत. तसेच दवाखान्यांपासून उपनगरीय रुग्णालयांमध्ये लसीकरणावर विशेष भर दिला जात असल्याचे उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख डॉ. प्रदीप जाधव यांनी सांगितले.

वर्ष    एक वर्षांखालील बालकांचा मृत्युदर

२०१८            २५

२०१७            २६

२०१६            २६

२०१५            २६

२०१४            २८

(दर एक हजार बालकांमागे)

बालमृत्यूची आकडेवारी

वर्ष           एक वर्षांखालील  बालके        नवजात बालके

२०१८           ३७२३                                   २२३९

२०१७           ४०७९                                   २५६३

२०१६           ३९९८                                   २४९८

२०१५           ४५७५                                   २७८८

२०१४           ४८८३                                   २९९९

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button