breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मुंढवा प्रकल्पावरच ‘जलसंपदा’कडून प्रश्नचिन्ह

प्रक्रिया केलेले पाणी घेण्यास शेतकरी अनुत्सुक

महापालिकेच्या मुंढव्यातील पाणीपुनर्वापर प्रकल्पांमधून प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा नदीतच सोडण्यात येते. तर, मुंढवा जॅकवेल प्रकल्पात पाण्यातील घनकचरा, तरंगणारे पदार्थ काढणे आणि हे पाणी शेतीयोग्य करणे अपेक्षित असताना ही प्रक्रिया केली जात नाही. परिणामी मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यास शेतकरी अनुत्सुक आहेत, असा दावा करत जलसंपदा विभागाकडून सोमवारी मुंढवा जॅकवेल प्रकल्पावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

ग्रामीण भागातील सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून महापालिकेकडून मुंढवा जॅकवेल प्रकल्प चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रतिदिन साडेपाचशे दशलक्ष लिटर आणि वर्षांला साडेसहा अब्ज घनफुट (टीएमसी) पाण्यावर प्रक्रिया केली जाते. शंभर कोटी रूपये खर्च केलेल्या या प्रकल्पामधून शेतीसाठी योग्य असे पाणी मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील शेतकरी प्रक्रिया केलेले पाणी घेण्यास अनुत्सुक आहेत, अशी माहिती जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांनी सोमवारी दिली.

जुना मुठा कालवा (बेबी कालवा) हा ब्रिटिशकालीन असून तो दौंडपर्यंत आहे. या कालव्यातून हवेली आणि दौंड भागाला पाणीपुरवठा करण्यात येतो. तर, पानशेत आणि वरसगाव धरणे बांधल्यानंतर तयार करण्यात आलेल्या मुठा उजवा कालव्यातून शहर आणि उर्वरित जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा नदीतच सोडले जाते. हे पाणी नदीत न सोडता त्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकणे अपेक्षित आहे. तर, मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून प्रक्रिया करताना पाण्यातील घनकचरा आणि इतर पदार्थ काढून हे पाणी शेतीयोग्य करणे अपेक्षित आहे. परंतु, हे पाणी शेतीयोग्य नसल्याचे सांगत जिल्ह्य़ाच्या उर्वरित भागातील शेतकरी मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यास अनुत्सुक आहेत. ही परिस्थिती एकीकडे असताना पुणे महापालिका आणि काही नागरिक जलसंपदा विभागाला मुंढवा जॅकवेलचे पाणी का उचलत नाही? असा सवाल करतात. पुणे महापालिकेला ठरलेल्या मापदंडानुसार पाणी दिल्यानंतर उर्वरित पाण्याचे काय करायचे, हा सर्वस्वी जलसंपदा विभागाचा प्रश्न आहे, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

पाणीनामा

पालिकेने पाणीवापराचे नवे वेळापत्रक तयार केले असून त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू केली आहे. परंतु, कालवा समितीची बैठक झाल्यापासून आतापर्यंत पालिका प्रतिदिन १२५० ते १३०० दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेत आहे. सध्या पालिका होळकर जलशुद्धीकरण केंद्रातून कालव्यातून पंपाने पाणी उचलत आहे. मात्र, जलवाहिनीचे काम झाल्यानंतर पालिकेला तेथून पंपाने पाणी घेता येणार नसून केवळ खडकवासला येथून थेट धरणातून पाणी देण्यात येणार आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button