“मी मेंटली फिट’ फिजिकली माहिती नाही – पंकजा मुंडे

- महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडेंची फिटनेस चॅलेंजवर प्रतिक्रिया
पुणे – “मी मेंटली फिट आहे, फिजिकली माहिती नाही’ अशा शब्दांत महिला- बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी फिटनेस चॅलेंजला आपण फारसे महत्त्व देत नसल्याचे अधोरेखित केले आहे. केंद्रातील भाजप सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मुंडे यांनी सरकारच्या कामगिरीचा आलेख पत्रकार परिषदेत मांडला.
यावेळी भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते. केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिलेले फिटनेस चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले. त्यानंतर राज्यात गिरीश महाजनांसह अनेक नेत्यांनी, खेळाडूंनी, अभिनेते – अभिनेत्रींनी एकमेकांना फिटनेस चॅलेंज दिले. त्यामुळे याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. त्याच विषयात मुंडे यांना विचारले असता त्यांनी “मी मेंटली फिट आहे’ असे उत्तर दिले.
माझे बॉस अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी अठरा तास काम करत असल्याने मलाही ते करावे लागते. मीही गेल्या चार वर्षांत दिवसाला केवळ चार तासच झोप घेते, असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या बाजूला बसलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीही मी तर फिटच आहे, मला गरज नाही, असे पुणेरी उत्तर दिले. पेट्रोल डिझेलवरील वाढलेल्या किंमतींवरही मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत मुख्यमंत्री केंद्र सरकारसोबत बोलणी करत असून लवकरच किंमती कमी होतील अशी आशा असल्याचे मुंडे म्हणाल्या. सत्तेत असताना असो किंवा विरोधात असताना असो पेट्रोलच्या किंमती वाढल्यावर आम्ही देखील अस्वस्थ होतो. त्यामुळे यासंदर्भात केंद्राशी बोलून मुख्यमंत्री तोडगा काढतील, असेही मुंडे म्हणाल्या.
मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कार्याचा आढावा मुंडे यांनी घेतला. केंद्राकडून राबवल्या गेलेल्या योजनांची मुंडे यांनी माहिती दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम केल्याचे मुंडे यांनी नमूद केले.
पालघरच्या व्हायरल क्लिपवर गैर काय
साम, दाम, दंड, भेद या वापरा, असे मुख्यमंत्र्यांनी पालघर येथील कार्यकर्त्यांना सांगितल्याची क्लिप व्हायरल झाली आहे. त्याविषयी विचारले असता महिला-बालकल्यानमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. वास्तविक ते संभाषण मी अद्याप ऐकले नाही. परंतु पालघर येथील निवडणुकीत सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना बल देणे, सर्व पद्धतीने लढायला सांगणे यात काहीच गैर नाही, असे मुंडे म्हणाल्या.