मी ऋषभ पंतची विश्वचषक संघात निवड केली असती – दिलीप वेंगसरकर

३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघामध्ये यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला पर्याय म्हणून ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकच्या नावाची चर्चा होती. मात्र एम.एस.के प्रसाद यांच्या निवड समितीने पंतऐवजी कार्तिकला संघात संधी दिली. निवड समितीच्या या निर्णयावर सोशल मीडियावर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रीया दिल्या. बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनीही कार्तिकऐवजी पंतच्या नावाला आपली पसंती दिली आहे.
“मी निवड समितीचा प्रमुख असतो तर मी ऋषभ पंतला संघात संधी दिली असती. ऋषभ गुणवान खेळाडू आहे, त्याला संघात संधी मिळेल अशी माला आशा होती. तो सध्या चांगली फलंदाजी करतो आहे. मात्र सध्याची निवड समिती अनुभवी यष्टीरक्षकाच्या शोधात असल्यामुळे कार्तिकला संघात जागा मिळाली असेल.” वेंगसरकर Khaleej Timesया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या निवड समितीने, अंबाती रायुडूला वगळून विजय शंकरला संघात जागा दिली आहे. निवड समितीच्या या निर्णयावरुनही सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. विश्वचषकात भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.