मिल बैठे जब दो यार…भोसरीत आमदार लक्ष्मण जगताप-माजी आमदार विलास लांडे ‘महायुती’

- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती
- ज्येष्ठ नेते विलास लांडे यांच्या गौरव समारंभाचे निमित्त
पिंपरी। भोसरी विधानसभा मतदार संघातील माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गौरव समारंभाला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. दोघांचे पक्ष प्रतिस्पर्धी असले तरी, जगताप आणि लांडे यांच्यातील मित्रप्रेम कायम आहे. त्यामुळे ‘मिल बैठे दो यार’ अशी खुमासदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विशेष म्हणजे, राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते असलेले जगताप आणि लांडे तसेच, भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे ‘सारथी’ असलेले विरोधी पक्षनेते दत्ता साने एकाच व्यासपीठावर आल्यामुळे भोसरीत गौरव समारंभाच्या निमित्ताने सत्ताधारी-विरोधक आणि स्वपक्षीय अशी ‘महायुती’ पहायला मिळाली आहे.
वास्तविक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते गौरव समारंभात विलास लांडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला आहे. याठिकाणी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर हनुमंत भोसले, वैशाली घोडेकर, मोहिनी लांडे, तसेच वसंत लोंढे, नगरसेवक संजय वाबळे, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत चूक झाली- दत्ताकाका साने
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझी चूक झाली. मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळा विषय ठेवला पाहिजे. त्यामुळे गेल्यावेळी राष्ट्रवादीला फटका बसला. आमदार जगताप आणि विलास लांडे यांची मैत्री वेगळी आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण, यापुढे मैत्री आणि राजकारण यात गफलत करणार नाही. पक्षाचे काम तन मनाने करणार आहे, असा भावना यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी व्यक्त केल्या.
विलास लांडे यांना विधान परिषदेवर पाठवा
आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्षाचे बांधणी मजबूत करायची असेल, तर राष्ट्रवादीतील पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार विलास लांडे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणीही यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दत्ता साने यांनी जाहीरपणे केली.