breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळच्या खासदाराबाबत मतदारांचा कौल गुलदस्त्यात

  • स्पष्ट कौल न मिळाल्याने वाढला संभ्रम
  • चित्र स्पष्ट होणार 23 मेनंतरच

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदार संघावर खासदारकीची भिस्त असली तरी एकूण मतदारांची अस्पष्ट भूमिका पाहता मावळचा खासदार कोण होणार याबाबतचा अंदाज बांधणे कठीण जात आहे. कोणतीही लाट नसताना मतदारांनी जो कौल दिला आहे. त्यावरून श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यांच्यात जोरदार टस्सल झाल्याचे दिसते. दोघांपैकी जो कोणी निवडून येईल, तो फार काही मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असे वाटत नाही. याची झलक मतदारांनी स्पष्टपणे कौल न देता दाखविली आहे.

मावळ लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा येतात. पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात सर्वाधीक 10 लाखांहून अधिक मतदार आहेत. दरवेळी या दोन्ही मतदार संघावर खासदारकीची भिस्त अवलंबून राहते. परंतु, यावेळचे चित्र वेगळे आहे. 2014 मध्ये मोदी लाटेवर विश्वास ठेवून सर्व स्तरातील मतदारांनी मतदान केले होते. त्यात खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय झाला होता. परंतु, आजची ही निवडणूक कोणत्या लाटेवर अधारीत किंवा व्यक्ती केंद्रीत नसून ती मतदारांच्या भूमिकेवर अवलंबलेली होती. त्यामुळे बारणे असतील किंवा पार्थ पवार यांना स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तविणे कठीण आहे.

चिंचवड आणि पनवेल विधानसभेत भाजपचेच आमदार आहेत. चिंचवड मतदार संघात भाजपचा मतदार असला तरी सुरूवातीला भाजपच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी बारणे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या गडूळ वातावरणाचा मतदारांच्या मनावर थोडाबहुत परिणाम पडलेला आहे. पनवेल विधानसभेत शेतकरी कामगार पक्षाची ताकद मोठी आहे. कोळी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेकापने उभा केलेला संघर्ष यामुळे त्या भागातील एक गठ्ठा मतदान शेकापने राखून ठेवले आहे. आघाडीचा धर्म पाळण्यासाठी हे मतदान पार्थ पवार यांना देण्याचा धर्म शेकापचे नेते जयंत पाटील यांनी पाळला नसेल कशावरून. मावळ, उरण, कर्जत, खोपोली, खालापूर हा शहरी भागातील काही प्रमाण सोडले तर ग्रामीण भागात भाजप-शिवसेनेची म्हणावी तेवढी ताकद दिसत नाही. त्यातच मनसेने जोरदार मुसंडी मारल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून हे मतदान दुभंगल्याचे चित्र आहे.

पिंपरीतल्या हक्काच्या मतांबाबत साशंकता

पनवेल आणि चिंचवड दोन्ही मिळून 10 लाख मतदान आहे. पनवेलमधून 2 लाख 98 हजार 349 मतदारांनी मतदान केले. तर, चिंचवडमधून 2 लाख 83 हजार 4 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अपेक्षेपेक्षा दोन्ही मतदार संघात कमी मतदान झाले. पिंपरी मतदार संघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या भागातील मतदारांवर कायमच हक्क गाजवला जातो. पिंपरीतून 1 लाख 89 हजार 404 एवढे मतदान झाले आहे. हे मतदान निर्णायक ठरणार असून येत्या 23 मे रोजीच या मतदारांचा कौल कोणाला मिळाला, हे स्पष्ट होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button