मालमत्तेसाठी भावाकडून बहिणीचा खून, निनावी पत्रामुळे प्रकरणाचा उलगडा

पिंपरी – मालमत्तेच्या वादातून बहिणीचे डोके आपटून तिचा खून केला. हा खून लपविण्यासाठी हृदयविकाराचा झटका आलेल्या बहिणीला रुग्णालयात नेत असताना मोटारीला आग लागून त्यात तिचा मृत्यू झाल्याचा बनाव भावाने केला. मात्र एका निनावी अर्जामुळे आठ महिन्यांनी या प्रकरणाला वाचा फुटली आहे.
संगीता मनीष हिवाळे असे खून झालेल्या बहिणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा भाऊ जॉन डॅनियल बोर्डे ( वय ४०, रा. सौंदर्य कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सहाय्यक निरीक्षक उद्धव खाडे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत संगीता हिवाळे यांचे पतीशी मतभेद असल्याने त्या भावाकडे राहात होत्या. ९ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास आरोपी जॉन आणि संगीता यांच्यात वाद झाला. यावेळी जॉन याने संगीताचे डोके फरशीवर आपटले. डोक्याला जबर मार लागल्याने संगीता यांचा जागीच मृत्यू झाला.
खुनाचा हा प्रकार उघडकीस येऊ नये तसेच संगीता यांच्या विम्याचे ३० लाख रूपये मिळावेत म्हणून जॉन याने संगीता यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा कांगावा केला. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी मोटारीत बसवले.
वाकड येथील सयाजी हॉटेलच्या पुढे मुंबई -बेंगलोर महामार्गावर निर्मनुष्य ठिकाणी गाडी पेटवून दिली. शॉर्ट सर्किटमुळे मोटार पेटून त्यात होरपळून बहिणीचा मृत्यू झाल्याचे आरोपी जॉन याने पोलिसांना सांगितले. मात्र, एका निनावी अर्जामुळे पोलिसांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली असता, जॉन याने खून केल्याचे समोर आले आहे.एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी ही घटना समोर आल्याने समाजात वाढत चालेल्या गुन्ह्याचे वास्तव समोर येत आहे.