Mahaenews

माध्यमांमध्ये कोणा एकाचे वर्चस्व नको – स्मृती इराणी

Share On

नवी दिल्ली – कोणा एकाचे वर्चस्व निर्माण होऊ नये म्हणून माध्यम उद्योगामध्ये समतोल साधण्यासाठी सहाय्यभूत ठरतील असे नियम, कायदे आणि आचारसंहिता तयार करण्याची आता वेळ आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी आज नवी दिल्ली येथे केले. 15 व्या “आशिया माध्यम शिखर परिषद 2018′ च्या उद्‌घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

भारतात 2021 पर्यंत जवळपास 969 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते असणार आहेत. डिजिटल व्यवहारांचा वाढता व्याप लक्षात घेतल्यानंतर, भारतीय प्रसार माध्यम त्याकडे केवळ आव्हान म्हणून पाहत नाहीत तर ती एक संधी म्हणून पाहत आहे, हे जाणवते. त्यामुळेच आता माध्यम उद्योगांमध्ये समतोल साधणे अत्यंत गरजेचे आहे, असे इराणी यांनी यावेळी स्पष्ट केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी), ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंट यांच्या संयुक्त विद्यमाने या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेला वेगवेगळ्या 39 देशांमधून 220 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत.

Exit mobile version