मादाम तुसा संग्रहालयात काजोलची एन्ट्री

बऱ्याच काळापासून रूपेरी पडद्यावरून गायब असलेली अभिनेत्री काजोल लवकरच कमबॅक करण्यास तयार असली, तरी सध्या चर्चा सुरू आहे तिच्या मेणाच्या पुतळ्याची. सिंगापूरच्या मादाम तुसा संग्रहालयात काजोलचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या उद्घाटनासाठी काजोल तिच्या मुलीसोबत सिंगापूरला पोहोचली होती. उद्घाटनादरम्यानचे काजोलचे काही फोटोज् आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गुरुवारी काजोलच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. काजोलने आपल्या पुतळ्यासोबत काही फोटोही क्लिक केले. यावेळी काजोल मुलगी न्यासासोबत उपस्थित होती. काजोलचा हा पुतळा इतका हुबेहुब आहे की, पुतळा पाहिल्यानंतर न्यासाचाही गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. काजोलचा पती अभिनेता अजय देवगण याने देखील इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत ‘मुक्या काजोलला भेटा’ असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.
काजोलने पुतळ्यासोबतचा एक सेल्फी ट्विट करत ‘ऑलेवेज बिन अ कॉजोल फॅन’ असं कॅप्शन लिहिले आहे. सध्या काजोल तिच्या आगामी ‘ईला’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून हा चित्रपट १४ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.