माथाडी, लेबर सप्लायर्सच्या नावावर लघू उद्योजकांना गुंडाकडून खंडणीचा होतोय त्रास

- पोलीस आयुक्तांकडे वारंवार मागणी करुनही बघ्याची भूमिका
- औद्योगिक क्षेत्रातील गुंडाचा बंदोबस्त करा, पोलिस आयुक्तांना पत्र
- चाकण, तळवडे, चिखली परिसराच उद्योजकांना जीवे मारण्याच्या धमक्या
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहराची उद्योगनगरी म्हणून ओळख आहे, शहरात छोटे-मोठे उद्योजकांमुळे कामगार, कष्टकरी वर्गाला रोजगार मिळाला, या कंपन्यामुळेच शहराची वाटचाल प्रगतीपथावर गेली. मात्र, काही गुंडामुळे उद्योगनगरी बदनाम होवू लागली आहे. शहरातील लघू उद्योजकांना खंडणी मागणे, जीवे मारण्याची धमकी देण्याचे सरार्स प्रकार घडत आहेत. स्क्रॅप, माथाडी व लेबर सप्लायर्स नावावर हप्त्याची मागणी होत आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील गुंडाचा बंदोबस्त करा, अशी मागणी भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस आणि नगरसेवक केशव घोळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष बापट, पोलिस आयुक्त आर.के. पद्यनाभन यांच्याकडे केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त आर. के. पद्यनाभन यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तळवडे, चाकण, चिखली, कुदळवाडी परिसरातील लघु उद्योजकांना, छोटे मोठ्या कारखानदारांना दररोज काही गुंड धमकावत आहेत. त्याच्याकडे स्क्रॅप, माथाडी, लेबर सप्लायर्सच्या नावाखाली राजरोसपणे जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. तसेच कारखाना चालवण्यास मज्जाव करीत आहेत. हप्प्त्यांची मागणी करुन उद्योजकांना त्रास दिला जात आहे. त्या गुंडाच्या गैरवर्तणुकीचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
अनेक उद्योजकांनी बॅंकामधून कर्ज काढून उद्योगधंदे सुरु केलेले आहेत. कर्जाचे हप्ते फेडणे त्याचा खुपच कठीण होत आहे. ते उद्योग चालवण्यासाठी खुप परिश्रम घेत आहेत. मात्र, संबंधित गुंड मोठ्या गाड्यामधून 8 ते 10 गुंडाना घेवून कंपनीमध्ये येतात. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत पैसे वसुलीचे काम करीत आहेत. जे उद्योजक पैसे देत नाहीत. त्यांना कंपनी बंद करण्याचा मज्जाव करीत आहेत. त्या गुंडाचा तातडीने बंदोबस्त करावा, संबंधितावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, उद्योगनगरीतील लघु उद्योजकांना सुरक्षित व भयमुक्त वातावरण तयार करावे, अशी घोळवे यांनी केली आहे.
पोलिस आयुक्तांची बघ्याची भूमिका
पिंपरी चिंचवड पोलिस आयु्क्तालय कार्यालयातंर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यक्षेत्रातील चाकण, तळवडे, भोसरी, चिंचवड, चिखली, कुदळवाडी आदी परिसरात छोट्या मोठ्या लघुउद्योजकांना गुंडाचा त्रास होवू लागला आहे. अनेकदा खंडणी न दिल्यास जीवे मारण्यासह कंपनी बंद करण्याचा मज्जाव होत आहे. याविषयी पिंपरी चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रीज, काॅमर्स, सर्व्हिसेस अॅण्ड अॅग्रीकल्चर यांनी गुंडाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. तसेच परदेशी उद्योजकांनी देखील स्थानिक गुंडाचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलिस आयुक्त आर. के. पद्यनाभन यांच्याकडे केली होती. परंतू, पोलिस आयुक्त केवळ बघ्याची भूमिका घेत असून त्या गुंडावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या गुंडाचा लघु उद्योजक त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याबाबत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे पोलिस आयुक्तांबाबत तक्रार पिंपरी चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रीज, काॅमर्स, सर्व्हिसेस अॅण्ड अॅग्रीकल्चर यांनी केली आहे.