माढा लोकसभा, 20 अपक्षांसह 31 उमेदवार उतरले रिंगणात

सोलापूर – माढा लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल केलेल्या 37 उमेदवारांपैकी सहा उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता 20 अपक्षांसह 31 उमेदवार रिंगणात उरले आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा दुरंगीच सामना होणार आहे.
तिसर्या टप्प्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. 28 मार्च रोजी माढ्यासाठी अधिसूचना जारी झाल्यानंतर तब्बल 42 उमेदवारांनी 52 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांपैकी 5 अर्ज छाननीमध्ये बाद झाले. त्यानंतर सोमवारी (दि. 8) सह्याद्री सूर्याजीराव ऊर्फ चिमणराव कदम, बशीरअहमद बाशामियाँ शेख, विठ्ठल ज्ञानदेव ठावरे, अशोक ज्ञानदेव वाघमोडे, रामचंद्र केशव गायकवाड व दिनकर शिवाजी देशमुख या सहा अपक्ष उमेदवारांनी अर्ज काढून घेतले. त्यामुळे माढ्याच्या आखाड्यात आता 31 उमेदवार उरले आहेत. रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडी, बसप या प्रमुख पक्षांसह इतर आठ नोंदणीकृत पक्ष व 20 अपक्षांचा समावेश आहे. माढ्यामध्ये राष्ट्रवादीच्या संजय शिंदे व भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे.
दरम्यान, माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाअधिकारी रामचंद्र शिंदे यांनी निवडणूक निरीक्षक कवींद्र कियावत यांच्या उपस्थितीत उमेदवारांची बैठक घेऊन चिन्ह वाटप केले. त्यामुळे माढ्याचे चित्र स्पष्ट झाले असून आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
माढ्यातून हे आहेत उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे, भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अखिल भारतीय एकता पार्टीच्या ब्रह्मकुमारी प्रमिलाबेन, बहुजन समाज पक्षाचे आप्पा लोकरे, वंचित बहुजन आघाडीचे विजयराव मोरे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे रामचंद्र घुटूकडे, बहुजन महापार्टीचे शहाजान शेख, हिंदुस्थान प्रजापक्षाचे नवनाथ पाटील, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे नानासाहेब कदम व बहुजन मुक्ती पार्टीचे सुनील जाधव यांच्यासह विजयराज माने-देमशुख, विजयानंद शिंदे, दौलत शितोळे, संदीप खरात, अजिनाथ केवटे, रामदास माने, सिद्धेश्वर आवारे, बापूराव रूपनवर, रोहित मोरे, दत्तात्रय खटके, सविता आयवळे, संतोष बिचकुले, मारुती केसकर, विश्वंभर काशीद, मोहन राऊत, आण्णासाहे मस्के, बळीराम मोरे, नंदू मोरे, सचिन जोरे, संदीप पोळ, सचिन पडळकर यांच्या लढत होणार आहे.