महिलेने २८ वेळा ओटीपी सांगितल्याने ७ लाख लंपास

नवी मुंबई : नेरुळ येथे राहणाऱ्या एका महिलेने एक-दोन नव्हे तर आठवडाभरात चक्क २८ वेळा आपला ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) फोनवर सांगितला. मग काय जे होणार होते तेच झाले. बाईंच्या बँक अकाउंटमधून सात लाख रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तसनीम मुज्जकर मोडक असे या महिलेचे नाव आहे. १७ मे रोजी त्यांना एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की तो तसनीमच्या बँकेतून बोलत आहे. तांत्रिक कारणांमुळे त्यांचे डेबिट कार्ड ब्लॉक होणार आहे. तुमच्या मोबाईलवर जो ओटीपी येईल, तो सांगा मग तुमचे कार्ड ब्लॉक होणार नाही, असे त्याने सांगितले आणि तसनीम यांनी ओटीपी सांगून टाकला.
केवळ ओटीपीच नव्हे तर डेबिट कार्डावरील १६ डिजीट क्रमांक, नाव, तीन डिजीटचा सीव्हीव्ही क्रमांकही तसनीम यांनी सांगून टाकला. त्यानंतर तसनीम यांना २८ वेळा फोन आला. तितक्या वेळा त्यांनी ओटीपी सांगितला. त्यांच्या खात्यातून ६ लाख ९८ हजार ९७३ रुपये काढण्यात आले होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बी. एन. आवटी यांनी दिली.
तसनीम यांच्या बँक खात्यातून मुंबई, नोएडा, गुरुग्राम, कोलकाता आणि बेंगळुरूत पैशांचे व्यवहार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी तीन वेगवेगळे मोबाइस सिमकार्ड यासाठी वापरले.