महिलेचा विनयभंग करणा-या भाजप पदाधिका-याला अटक करा

शिवसेना महिला आघाडीची भोसरी पोलिसांकडे मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आणि भयमुक्तचा नारा देणाऱ्या भाजप तालुकाध्यक्षाने महिलेचा विनयभंग केला आहे. संबंधित आरोपीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिवसेना संघटिका सुलभा उबाळे, वेदश्री काळे, शशिकला उभे, स्मिता जगदाळे, आशा भालेकर, रुपाली आल्हाट, विजया जाधव, नंदा दातकर, जनाबाई गोरे, दमयंती गायकवाड, श्रीदेवी लामजने, कोमल साळुंखे, अक्षदा शेळके आदी महिला उपस्थित होत्या.
शिवसेना महिला आघाडीने दिलेल्या म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून आरोपी पीडित महिलेला त्रास देत होता. तसेच त्याने अश्लील व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग केला. यावरून त्रासलेल्या महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या पदाधिकारी महिलेला अशा प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागणं. ही बाब गंभीर आहे. पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे आरोपी अटकपूर्व जमीन मिळवू शकतो. म्हणून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करावी, अशा विकृत मानसिकतेच्या अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली तर राजकीय क्षेत्रात महिला येणार नाहीत. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो, परंतु पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता त्यांचे काम चोखपणे करायला हवे. असेही निवेदनात म्हटले आहे.